
जमीन विक्रीच्या नावाखाली २.८९ कोटींचा गंडा! (Photo Credit - AI)
नेमकी घटना काय?
बीड येथील रहिवासी अशोक लोढा आणि त्यांचे भागीदार सय्यद नजीर सय्यद वजीर हे छत्रपती संभाजीनगरात जमिनीच्या शोधात होते. एजंट शेख रईस याच्यामार्फत त्यांची ओळख जमीन मालक आणि मैत्रेय प्लॉटिंग सेंटरच्या भागीदारांशी झाली. मौजे सातारा परिसरातील गट क्रमांक २० मधील १०३.५५ आर जमीन विक्रीसाठी असल्याचे त्यांना सांगण्यात आले.
अशी झाली फसवणूक
आरोपींनी आधीच संबंधित जमिनीवर प्लॉटिंग करून त्यांची विक्री केली होती. जमिनीमध्ये रस्त्यासाठी सोडलेल्या क्षेत्राचा गैरफायदा घेऊन, ते क्षेत्र सातबारा उताऱ्यावर स्वतःच्या नावे असल्याचे दाखवले आणि व्यवहार केला. १८ मार्च २०२४ रोजी व्यवहार पूर्ण झाल्यानंतर लोढा यांनी जमिनीभोवती तार कुंपण घालून पत्र्याचे शेड बांधले होते.
वॉचमनला हाकलले, शेड पाडले
२६ मार्च २०२५ रोजी फिर्यादी लोढा यांच्या जमिनीवर खेडकर नामक व्यक्ती आणि त्यांच्या वॉचमनने आक्रमण केले. त्यांनी फिर्यादींनी बांधलेले पत्र्याचे शेड पाडून टाकले आणि तिथल्या वॉचमनला हाकलून दिले. लोढा यांनी चौकशी केली असता, त्यांना समजले की त्यांनी खरेदी केलेली जमीन प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही आणि ती आधीच इतरांना विकली गेली आहे.
‘या’ ८ जणांविरोधात गुन्हा दाखल
फिर्यादी अशोक लोढा यांच्या तक्रारीवरून सातारा पोलिसांनी खालील ८ जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे: १. मंजिरी अलोक चौधरी २. स्वप्ना विद्याधर बडीगणवार ३. मोहिनी दिलबागसिंग ४. जावेद खाँ नुरखाँ पठाण ५. सुरेश सिताराम इंगळे (भागीदार, मैत्रेय प्लॉटिंग सेंटर) ६. बद्रीनारायण नागोराव करे ७. साहेबराव कचरु घुगे ८. बाबुराव आनंदराव ताठे जमीन शिल्लक नसतानाही आरोपींनी संगनमताने फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सातारा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.