crime (फोटो सौजन्य : social media)
एक कोंबडा शेजाऱ्याच्या घरात पळाल्याने वाद झाला. या झालेल्या वादातून तुंबळ हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. यात कोंबडा मालकावर गुन्हा दाखल झाला असून ज्यांच्या घरात हा कोंबडा शिरला त्यांना मारहाण झाली आहे. ही घटना आंबेरनाथ तालुक्यातील उल्हासनगर येथे घडली आहे. अंबरनाथ तालुक्यात या वादाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
हिललाईन पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, अंबरनाथ तालुक्यातील खोणी गावाजवळ शेलार पाडा येथे विलास वाघे आणि गुरुनाथ वाघे हे कुटुंबीय राहतात.हे दोन्ही कुटुंबीय एकमेकांच्या शेजारी राहतात. शुक्रवार २ एप्रिल रोजी सकाळी साडे नऊच्या सुमारास विलास वाघे यांचा कोंबडा गुरुनाथ वाघे यांच्या घरात शिरला. गुरुनाथ वाघे यांच्या पत्नी मनीषा वाघे यांनी हा कोंबडा हाकलण्यासाठी दगड फेकला.
कोंबड्याला दगड मारून फेकल्याने कोंबड्याचे मालक विलास वाघे यांना राग आला. त्यामुळे विलास वाघे यांनी मनीषा वाघे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. माझ्या पत्नीला शिवीगाळ का करतो आहेस, असा जाब गुरुनाथ वाघे यांनी विचारला. जाब विचारला म्हणून विलास वाघे यांना राग आला. त्यामुळे विलास वाघे यांनी जमिनीवरील दगड उचलून गुरुनाथ वाघे यांच्या डोक्यात डाव्या कानाच्या बाजूला मारून फेकला. त्यामुळे गुरुनाथ वाघे खाली पडले.
यानंतर याठिकाणी कैलास वाघे आणि कुदन वाघे आले आणि यांनी आपापसात संगणमत करून गुरुनाथ वाघे यांना शिवीगाळ केली. त्याच वेळेस त्यांना हाताने ठोशाबुक्याने मारहाण सुद्धा केली. गुरुनाथ वाघे यांना मारहाण होत असल्याचे पाहताच त्यांचा मेहुणा बाळाराम वाघे, मनीषा वाघे हे तिथे आले. यावेळी विलास, कैलास आणि कुदन या तिघांनी त्यांना देखील ठोशाबुक्याने मारहाण केली. तसेच बाळाराम वाघे याच्या डोक्यात डाव्या बाजूला लाकडी दांडक्याने मारहाण करत दुखापत केली.
या प्रकारानंतर गुरुनाथ वाघे यांनी हिल लाईन पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून विलास वाघे, कैलास वाघे, कुदन वाघे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिललाईन पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अंबरनाथ तालुक्यात सध्या कोंबड्यावरून झालेल्या या वादाची चांगलीच चर्चा रंगली आहे.अंबरनाथ तालुक्यात या वादाची चांगलीच चर्चा रंगली आहे.