सौजन्य फोटो - सोशल मिडीया
वसई : उलट्यांचा त्रास होत असल्याने उपचारासाठी क्लिनिकमध्ये नेलेल्या अवघ्या आठ वर्षांच्या चिमुकलीचा उपचारानंतर काही वेळातच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वसई पूर्वेतील भोयदापाडा परिसरात घडली. कथित बोगस डॉक्टरने दिलेल्या गोळ्या आणि दोन इंजेक्शन्सनंतर मुलीच्या नाकातून व तोंडातून रक्तस्राव सुरू झाला आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई करत वालीव पोलिस ठाण्यात संबंधित डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वसई पूर्वेतील भोयदापाडा परिसरात राहणारी मरियम अन्सारी (८) हिला २८ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास उलट्या सुरू झाल्या. तिची प्रकृती पाहता आईने तिला राजावळी पालनगर येथील ‘राहुल क्लिनिक’मध्ये नेले. तेथे धूपचंद निषाद (४२) याने मरियमची तपासणी करून काही गोळ्या दिल्या. तसेच दोन इंजेक्शन्स दिल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
हेही वाचा: चौकशीदरम्यान आरडाओरड अन् ‘अँग्झायटी अटॅक’चा दावा; डॉ. गायकवाड हल्ला प्रकरणात ‘बिग बॉस’फेम दिव्याची कोठडी वाढली
दुसऱ्या दिवशी सकाळी आईने मरियमला चहा आणि टोस्ट दिला. त्यानंतर काही वेळातच तिच्या नाकातून आणि तोंडातून अचानक रक्तस्राव सुरू झाला. प्रकृती बिघडल्यानंतर काही वेळातच तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाईकांनी उपचाराबाबत गंभीर आरोप केले. मात्र, मुलीच्या मृत्यूचे नेमके वैद्यकीय कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, शवविच्छेदन अहवालानंतर त्याबाबत अधिक स्पष्टता येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेनंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने संबंधित क्लिनिकची चौकशी केली. महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांच्या माहितीनुसार, धूपचंद निषाद स्वतःकडे ‘इलेक्ट्रो होमिओपॅथी’ची पदवी असल्याचे सांगत होता. मात्र, त्याच्याकडे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची (MMC) मान्यताप्राप्त वैद्यकीय पदवी नसल्याचे तपासणीत आढळल्याचे सांगण्यात आले. तरीही तो अॅलोपॅथीची औषधे आणि इंजेक्शन्स देत असल्याचा आरोप आहे. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीनिवासराव दुधमल यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर वालीव पोलिसांनी संबंधित डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला.
वालीव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप केरेकर यांनी सांगितले की, संबंधित डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिमुकलीच्या शवविच्छेदन अहवालानंतर तिच्या मृत्यूचे अचूक कारण स्पष्ट होईल. त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, आरोपी धूपचंद निषाद याने स्वतःवरील आरोप फेटाळले असून, नातेवाईकांचे आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील नेमके वैद्यकीय कारण आणि उपचारांची भूमिका तपासातून स्पष्ट होणार आहे.






