संग्रहित फोेटो
पुणे : अंगारकी चतुर्थीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी दुचाकीवरून पुण्याच्या दिशेने निघालेल्या दाम्पत्याला जुन्या कात्रज घाटातील बोगद्याजवळ अडवून लुटल्याची धक्कादायक घटना घडली. पहाटेच्या अंधारात दबा धरून बसलेल्या तिघांनी दाम्पत्याला जिवे मारण्याची धमकी देत महिलेच्या गळ्यातील सुमारे एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेतले. घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत काही तासांतच तिन्ही संशयितांना अटक केली.
हेही वाचा:Pune Crime: अवघ्या थुंकण्यावरून वाद टोकाला; मुंढव्यात लोखंडी हत्याराने दोघांवर हल्ला
दर्शनाच्या ओढीने निघाले अन् घाटात अडवले
खेड शिवापूर येथे राहणारे ४६ वर्षीय तक्रारदार आणि त्यांची पत्नी मंगळवारी पहाटे दुचाकीवरून पुण्याच्या दिशेने निघाले होते. अंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी ते पुण्यात येत होते. मात्र, जुन्या कात्रज घाटातील बोगद्याजवळ आल्यानंतर त्यांचा प्रवास अचानक थांबला. पहाटेच्या निर्मनुष्य आणि अंधाऱ्या वातावरणाचा फायदा घेत तीन आरोपी दबा धरून बसले होते. त्यांनी दाम्पत्याची दुचाकी अडवली. त्यानंतर जिवे मारण्याची धमकी देत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेतले. सुमारे एक लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र घेऊन आरोपी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले.
घाबरलेल्या दाम्पत्याने पोलिसांना दिली माहिती
या प्रकारामुळे दाम्पत्य घाबरले. त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. काही तासांतच पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. तौहिद असल शहा (२३, रा. पिंपरी), सुलेमान यासिन शेख (२१, रा. पिंपरी) आणि रोहित बबलू सिंग (२०, रा. पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
घाटात आणखी गुन्हे केले का? पोलिसांची चौकशी
अटक करण्यात आलेल्या तिघांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. या टोळीने कात्रज घाट किंवा परिसरात अशाच प्रकारे आणखी काही नागरिकांना लक्ष्य केले आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत. अंगारकी चतुर्थीच्या पहाटे घडलेल्या या घटनेमुळे घाट परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.






