कामावरून काढल्याने वेंडरची आत्महत्या; आदिवासी सेनेचे इगतपुरी रेल्वे स्थानकात धरणे आंदोलन
इगतपुरी : मध्य रेल्वेच्या इगतपुरी विभागात कित्येक वर्षांपासून काम करणाऱ्या वेंडर कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आले. त्यामुळे अनेक वेंडर तणावात होते. त्यातच मानसिक तणावात दशरथ पोपट माळी या वेंडरने आत्महत्या केली. त्यामुळे कामगारांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच्या निषेधार्थ आदिवासी सेनेने इगतपुरी रेल्वे स्थानकात धरणे आंदोलन केले.
सर्व कामगारांना पूर्ववत कामावर घ्या व आत्महत्या केलेल्या कामगाराच्या कुटुंबाला आर्थिक भरपाई मिळावी, या मागण्यांसाठी अखिल भारतीय आदिवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष दि. ना. उघाडे यांच्या प्रमुख नेतृत्वात वेंडर कामगारांनी रेल्वे स्थानकात धरणे आंदोलन केले. इगतपुरी रेल्वे स्थानकावर दोडामणी व इराणी अशा दोन कॅन्टीन आहेत. त्यांत १५ ते २० वर्षापासून अनेक वेंडर कर्मचारी काम करतात. मात्र, मुजोर मालकांनी कामगार कमी करण्यासाठी जुन्या कामगारांना कोणतीही माहिती न देता कामावरून काढले. त्यामुळे वेंडर कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
दशरथ पोपट माळी या वेंडरचा लायसन्स बिल्ला इराणी कॅन्टीन मालकाने हिसकावून घेत त्याला शिवीगाळ करून हुसकावले. ऐन सणासुदीत काम गेल्याने कुटुंबाची जबाबदारी कशी पूर्ण करायची, या मानसिक तणावात माळी याने गावी जाऊन आत्महत्या केली. ही घटना पाहता कॅन्टीन मालकाने वेंडर मजुरांना पूर्ववत कामावर घ्यावे व आत्महत्या केलेल्या वेंडर कामगाराच्या कुटुंबाला आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, या मागण्यांसाठी अ.भा. आदिवासी सेनेतर्फे इगतपुरी रेल्वे स्थानकावर धरणे आंदोलन करत स्थानक प्रबंधक, रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस ठाणे अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
याप्रसंगी सोमनाथ आगीवले, भारती विर, अनुसया आगीवले, मंगाबाई आगीवले, शैला माळी, दुर्गा भगत, वर्षा गतीर, जया चौरे, सुरेखा बिन्नर आदींसह वेंडर कामगार अंदोलनात सहभागी झाले होते.
रोटाव्हेटर यंत्रात अडकून शेतकऱ्याचा मृत्यू
दुसऱ्या एका घटनेत, शेतकऱ्यांना अनेकदा नैसर्गिक आपत्तीसह इतर अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. त्यात सिन्नरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. रोटाव्हेटर यंत्रात अडकून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील जामगाव येथे रविवारी (दि. १९) रात्री आठच्या सुमारास घडली.