
येरवडा पोलिसांची दुहेरी कारवाई; वाहने चोरणाऱ्या चोरट्यांना ठोकल्या बेड्या
पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येरवडा पोलिसांनी दुहेरी कारवाई करत जबरी चोऱ्या करणाऱ्या तसेच वाहने चोरणाऱ्या चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. दोन कारवाईत पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून ऑटोरिक्षा, सोन्याची चैन तसेच एक वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
वाहन चोरी करणाऱ्या सुरज संतोष माने (वय २४, रा. रामनगर, येरवडा) याला पोलिसांनी अटक केली आहे. तर जबरी चोरी प्रकरणात आसिफ अजगर शेख (वय ३२), रा. कुलदिंपसिंग युवराजसिंग जुनी (वय २३) व मख्खनसिंग लाखनसिंग जुनी (वय ३२) यांना अटक केली आहे. ही कारवाई परिमंडळ चारचे उपायुक्त हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक )गुन्हे) पल्लवी मेहेर तसेच सहाय्यक निरीक्षक सुनिल साळुंखे व त्यांच्या पथकाने केली आहे.
शहरातील वाढत्या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी स्थानिक पोलीस हद्दीत गास्त घालत आहेत. यादरम्यान, येरवडा पोलिसांचे पथक गस्त घालत होते. तेव्हा संगमवाडी येथील पुलावर नागरिकांना लुटणारे तिघे संगमवाडीत थांबलेले आहेत, अशी माहिती मिळाली, या माहितीनुसार पथकाने याठिकाणी धाव घेतली. तसेच, सापळा रचून आसिफ, कुलदिंपसिंग व मख्खनसिंग जुनी यांना अटक केली असून, ते सराईत गुन्हेगार असल्याचे सांगतिले जाते. त्यांच्याकडून पावणे दोन लाखांचा ऐवज जप्त केला आहे. तसेच चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी आलेल्या सुरज माने याला पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याच्याकडून पोलिसांनी एक दुचाकी जप्त केली आहे.
पुण्यात पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह?
पुण्यातही सहा वर्षांपुर्वी सोनसाखळी चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. दिवसाला तीन ते चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असत. पादचारी महिला तसेच ज्येष्ठ महिला या चोरट्यांच्या टार्गेटवर असत. तीन राज्यात या टोळ्यांनी मोठा गोंधळ घातला होता. पुणे पोलिसांनी तीन राज्यातील माहिती एकत्रित करून या चोरट्यांचा माग सुरू केला होता. नंतर यातील काही टोळ्यांना पकडण्यात यश देखील आले होते. त्यांच्यावर मोक्कासारखी कारवाई देखील केली होती. नंतर या घटना थांबल्या होत्या. परंतु, आता पुन्हा सहा वर्षांनी सोन साखळी टोळ्या ॲक्टीव्ह झाल्याचे गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. त्यामुळे पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह झाले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.