
किरकोळ वादातून तरुणावर हल्ला
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे घडताना दिसत आहे. असे असताना छत्रपती संभाजीनगर किरकोळ वादातून तरुणावर हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. ‘तू भेटायला का आला नाही’ असे म्हणत तरुणाला दगडाने मारहाण करुन डोके फोडले. ही घटना गुरुवारी (दि.६) रात्री साडेनऊच्या सुमारास गोमटेश मार्केट परिसरात घडली.
उमीस शेख (रा. चेलीपुरा) असे मारहाण करणाऱ्याचे नाव असून, त्याच्याविरोधात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात तुषार सुभाष व्यवहारे (वय २५, रा. भगवती कॉलनी, जवाहर कॉलनी, गारखेडा परिसर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी व आरोपी दोघेही ओळखीचे असून, दोघे गोमटेश मार्केट येथील एसएसडी गिफ्ट शॉपीमध्ये काम करतात. ६ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी मित्र निसार भाईसोबत भल्ला चार्ट भंडार समोर उभा होता, त्याचवेळी आरोपी उमीस शेख तेथे आला आणि मी तुला भेटायला बोलावलं होतं, तू का नाही आलास? असे म्हणत शिवीगाळ करत त्याने फिर्यादीला लाथाबुक्यांनी मारहाण केली.
हेदेखील वाचा : Navi Mumbai:’१००० तुकडे करून टाकीन’ अशी दिली धमकी, कोलकत्त्यातील महिलेने खारघरच्या व्यक्तीकडून उकळले तब्बल ₹२४ लाख रुपये
तसेच रस्यावर पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या डोक्यात जोरात मारला. यात फिर्यादीच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो रक्तबंबाळ झाला. हल्ल्यानंतर आरोपीने जर माझ्याविरुद्ध तक्रार केलीस, तर बघून घेतो, अशी धमकी दिली. याप्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.
सिगारेट न दिल्याने तरुणाला मारहाण
दुसऱ्या एका घटनेत, पुण्यात हातगाडीवर काम करणाऱ्या १८ वर्षीय तरुणाला सिगारेट न दिल्याचा राग आल्याने दोघांनी काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मोरवाडी चौक येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.