कौटुंबिक वादातून विवाहितेची आत्महत्या (फोटो सौजन्य-X)
अहिल्यानगर : वळण येथे सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या छळाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केली. या तरुणाने व्हॉट्सअॅप स्टेटसवर सुसाईड नोट ठेवत राहत्या घरात गळफास घेतला. याप्रकरणी पत्नीसह चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतक ज्ञानेश्वर दत्तात्रय भाकरे हे पत्नी धनश्री व मुलीसह वळण येथे वास्तव्यास होते.
पती-पत्नीमध्ये घरगुती कारणांवरून वारंवार वाद होत असे. सुमारे पाच महिन्यांपूर्वी झालेल्या वादानंतर धनश्री या माहेरी पैठण येथे गेल्या होत्या. त्यानंतर ज्ञानेश्वर यांच्या नातेवाईकांनी त्यांना सासरी परत पाठवण्याची विनंती केली होती. मात्र, सासरच्या नातेवाईकांनी त्यास नकार दिल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे. ज्ञानेश्वर यांनी पत्नीला अनेकदा संपर्क करून वळण येथे परत येण्याची विनंती केली होती. मात्र, त्या परत आल्या नाहीत. तसेच सासरच्यांकडून शिवीगाळ करून खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे ज्ञानेश्वर यांनी नातेवाईकांना सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
पत्नीसह अनेकांवर गुन्हा दाखल
31 जुलैच्या मध्यरात्रीनंतर ज्ञानेश्वर यांनी एका कागदावर सुसाईड नोट लिहून ती व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवली. त्यानंतर राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी गणेश दत्तात्रय भाकरे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, धनश्री ज्ञानेश्वर भाकरे, संगिता खंडू काळे, अमोल खंडू काळे सुवर्णा संजय भाकरे या चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सासरच्या लोकांनी खूप त्रास दिला; नोटमध्ये उल्लेख
सुसाईड नोटमध्ये, मी स्वतः ज्ञानेश्वर दत्तात्रय भाकरे आत्महत्या करत आहे. माझ्या सासरच्या लोकांनी मला खूप त्रास दिला आहे. संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, असा मजकूर असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
कौटुंबिक वादातून विवाहितेची आत्महत्या
दुसऱ्या एका घटनेत, किरकोळ कारणावरून पती-पत्नीत वाद होऊन अबोला झाला. या तणावातून नंदिनी मंगलकर (वय ४५, रा. मिरे ले-आऊट, नंदनवर) हिने घरी गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.






