पैशाच्या वादातून तरुणाची हत्या; अपहरण करून निर्जनस्थळी नेलं अन् नंतर... (File Photo)
शुभम दिघोरी परिसरात ऑनलाईन सेवा केंद्र चालवत होता. या केंद्रातून तो विविध सरकारी योजना आणि नोकऱ्यांसाठी अर्ज भरून देण्याचे काम करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, त्याने नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेकांकडून पैसे घेतले होते. काही काळापूर्वी त्याने एका तरुणीकडून नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत ३० हजार रुपये घेतले होते. मात्र, तिला नोकरी मिळाली नाही. पैसे परत मागितल्यानंतर शुभम टाळाटाळ करू लागला. या प्रकाराची माहिती संबंधित तरुणीने तिच्या मैत्रिणीला आणि सावत्र भावाला दिली.
दरम्यान, मंगळवारी रात्री ती तरुणी मैत्रीण, भाऊ आणि त्याच्या काही मित्रांसह शुभमच्या कार्यालयात पोहोचली. तेथे पैशांवरून वाद झाला. त्यानंतर सर्वांनी मिळून शुभमला मारहाण केली. पुढे त्याला जबरदस्तीने वाहनात बसवून आउटर रिंग रोडवर नेण्यात आले.
मारहाणीत शुभम बेशुद्ध
पांजरी टोल नाक्याजवळील एका निर्जनस्थळी त्याला पुन्हा बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत शुभम बेशुद्ध पडला. त्यानंतर संबंधित तरुण आणि तरुणी त्याला तेथेच सोडून निघून गेले. सुमारे दोन तासांनंतर ते पुन्हा त्याच ठिकाणी आले. शुभम बेशुद्ध अवस्थेत पडलेला असल्याचे पाहून त्यांनी त्याला वाहनातून वैद्यकीय रुग्णालयात नेले. मात्र, उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत रुग्णालय प्रशासनाने हुडकेश्वर पोलिसांना माहिती दिली.
Q1. नागपुरात तरुणाची हत्या कशातून झाली?
प्राथमिक माहितीनुसार पैशाच्या वादातून तरुणावर हल्ला करण्यात आला.
Q2. मृत तरुणाचे नाव काय आहे?
मृत तरुणाचे नाव शुभम असून तो ३० वर्षांचा होता आणि दिघोरी परिसरात राहत होता.
Q3. शुभम काय काम करत होता?
शुभम दिघोरी परिसरात ऑनलाइन सेवा केंद्र चालवत होता. विविध सरकारी योजना आणि नोकऱ्यांसाठी अर्ज भरून देण्याचे काम तो करत होता.






