
गळ्यात चाकू भोसकून तरुणाची हत्या
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात नागपुरात चाकूने भोसकून तरुणाची हत्या करण्यात आली. जरीपटकाच्या मिसाळ ले-आऊट परिसरात मानेवर चाकूने वार करत तरुणाला संपवले. या हत्याकांडातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना 15 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
आदित्य प्रदीप मेश्राम (वय २२, रा. बाराखोली, इंदोरा) असे मृताचे नाव आहे. अटकेतील आरोपींमध्ये प्रीत अजय बोरकर (वय २४, रा. बाराखोली) आणि आविष्कार रवींद्र नाईक (वय २४, रा. बेझनबाग) यांचा समावेश आहे. आदित्य इलेक्ट्रिशियनचे काम करायचा तर आरोपी मजुरी करतात. गेल्या रविवारी आदित्य त्याचा मित्र रोहित मस्के याच्यासोबत इंदोराच्या फ्रेंड्स सावजी भोजनालयात जेवायला गेला होता. प्रीत आणि आविष्कारही तेथे जेवण करण्यासाठी आले होते. चौघेही मद्यधुंद होते. काही कारणातून रोहित आणि प्रीतमध्ये वाद झाला. तेव्हा रोहितने प्रीत आणि आविष्कारला जबर मारहाण केली होती.
हेदेखील वाचा : Dharashiv Crime: कला केंद्रातील नर्तिकेसाठी तरुणाने संपवले जीवन; देवदर्शनावरून परतताना किरकोळ वाद आणि…
दरम्यान, प्रीतविरुद्ध यापूर्वीही मारहाण आणि चाकूने हल्ला केल्याचा गुन्हा नोंद आहे. त्याला भीती होती की, रोहित पुन्हा त्याच्याशी वाद घालेल. सोमवारी तो घरातून चाकूसह निघाला होता. आविष्कारसोबत त्याने मद्यप्राशन केले आणि घराजवळच शेकोटी पेटवून बसला होता. एकाच परिसरात राहात असल्याने आदित्यला त्याच्यासोबत वाद नको होता. तो भांडण मिटविण्यासाठी दोघांनाही भेटायला गेला.
दोघांमध्ये वाद झाला अन् अचानक
काही वेळेपर्यंत त्यांच्यात सामान्य चर्चा झाली. तिघेही दारूच्या नशेत होते. अचानक काही गोष्टीवरून त्यांच्यात पुन्हा वाद उफाळला. प्रीतने गाडीतून चाकू काढत आदित्यच्या गळ्यावर वार केला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या आदित्यचा नंतर मृत्यू झाला.
ऑनलाईन मागविला होता चाकू
माहिती मिळताच जरीपटकावे ठाणेदार अनिल ताकसांडे पथकासह घटनास्थळी पोहोचले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात रवाना केला, पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून रात्री उशिरा दीन्ही आरोपींना अटक केली. प्रीतने काही महिन्यांपूर्वी ऑनलाईन वेबसाईटवरून चाकू मागविला होता.
हेदेखील वाचा : ‘मंत्र्याच्या कार्यालयात मी नोकरीला…’; महसूल मंत्र्यांच्या नावाने काळाबाजार, युवकाची 40 लाखांची फसवणूक