संग्रहित फोटो
कोल्हापूर : महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचेच वर्चस्व प्रस्थापित झाले असतानाच पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातही महायुतीचा करिश्मा पहावयास मिळाला. अनेक वर्षापासून हा काँग्रेस, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्मिच महाराष्ट्राला यंदाच्या निवडणुकीत हा मोठा धक्का सहन करावा लागत आहे. लाडकी बहिण योजना आणि हिंदू मतांचे झालेले ध्रुवीकरण याचा परिणाम मतपेटीतून भक्कम करणारा, तर महाविकास आघाडीला चिंतन करावयास लावणारा ठरला आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Election: कराड उत्तरमध्ये 25 वर्षांनी कमळ फुलले; मनोज घोरपडेंचा पाटलांना धोबीपछाड
पश्चिम महाराष्ट्रातील सहकार चळवळीवर महायुतीने कब्जा मिळवला असल्याचे निकालानंतर दिसून येते. सहकार चळवळीमुळे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हा राज्यातच नव्हे, तर देशात नावारुपास आला आहे. या जिल्ह्यात वर्षानुवर्षे काँग्रेस, राष्ट्रवादीने सहकारी संस्थांच्या माध्यमातून राजकीय पक्ष भक्कम केले होते. या निवडणुकीत या जिल्ह्यात महायुतीचे कार्ड यशस्वीरित्या चालले.
लोकसभा निवडणुकीप्रमाणे महाविकास आघाडी चमत्कार घडविणार, असे वाटत होते. पण महायुतीच्या नेत्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री व काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यासह महाविकास आघाडी नेत्यांचा करेक्ट कार्यक्रम केला.
पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब पाटील अशा दिग्गजांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. मराठा, धनगर आणि ओबीसी मते आपल्याकडे राखण्यात महायुतीने यश मिळविले. आघाडीकडून जातीयवादी मुद्दे उपस्थित झाले. ते खोडून काढण्यात यश आल्यानेच महायुतीला सर्वच जागा आपल्याकडेच राखल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रात मतांच्या टक्केवारीत महिला अल्प प्रमाणात आघाडीवर होत्या. या विजयामुळे सहकार क्षेत्रावर महायुतीने वर्चस्व प्रस्थापित केल्याचे चित्र या निकालावरुन स्पष्ट होत आहे.
सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात महायुतीचाच करिश्मा
कोल्हापूरात महायुतीच्या हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर, राजेंद्र पाटील-यड्रावकर, विनय कोरे या विद्यमानांना आपली आमदारकी टिकविण्यात यश आले. तर अमल महाडिक, राजेश क्षीरसागर चंद्रदीप नरके, शिवाजीराव पाटील, राहुल आवाडे यांनी पदार्पण केले. या निवडणुकीत महायुतीचा झंझावात पहावयास मिळाला. आघाडीच्या बाजूने निघालेल्या मुस्लिम समाजाचा फतवा हा हिंदू मताच्या ध्रुवीकरणास कारणीभूत ठरला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय गृहमंत्री अमिता शहा, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्या सभा प्रभावी ठरल्या. हिंदुत्वाचा आक्रमक मुद्दा आणि भगवे वादळ निर्माण करण्यात या नेत्यांना यश आले.
‘बटेंगे तो कटेंगे’ ‘वोट जिहाद’, ‘एक है, तो सेफ है’ हा हिंदू फॅक्टर पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला चमत्कार घडवून दिला. पाडापाडीच्या मनोज जरांगे पाटील यांच्या छुप्या आदेशाला न जुमानता मराठा फॅक्टरने महायुतीच्या पाठिशी राहण्याचा घेतलेला निर्णय, युवा मतदारांचा महायुतीला मिळालेली साथ, शेतकऱ्यांना मिळालेली वीज सवलत, अशा अनेक मुद्यांचा प्रभाव मतपेटीतून महायुतीला मिळाला. हे नाकारता येणार नाही.
आत्मविश्वास नडला
पश्चिम महाराष्ट्रात महाविकासा आघाडीला विजयाचा मोठा विश्वास होता. सहकार चळवळीमुळे वर्षानुवर्षे सत्ता आपल्याकडेच राखण्यात आल्याने या निवडणूकीत विजय मिळवू हा आत्मविश्वास या नेत्यांना चांगलाच महागात पडला.
हेदेखील वाचा : Eknath Shinde For Shivsena: ‘वर्षा’वर शिवसेनेची महत्वाची बैठक; एकनाथ शिंदेंबाबत पक्षाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय