कराड उत्तरमध्ये मनोज घोरपडे यांचा विजय (फोटो- फेसबुक)
कराड: काल महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात महायुतीने अभूतपूर्व असे यश प्राप्त केले आहे. तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. महाविकास आघाडीतील कोणत्याच पक्षाकडे विरोधी पक्ष नेमण्यासाठी लागते तितकेही बहुमत नसल्याचे समोर आले आहे. महायुतीने महाविकास आघाडीला 50 वरच रोखले आहे. दरम्यान , आता महायुतीच्या नवीन सरकारचा शपथविधी 25 तारखेला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होण्याची शक्यता आहे. तर दरम्यान भाजपने 25 वर्षांनी कराड उत्तरमध्ये कमळ फुलले आहे.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात मनोज घोरपडे यांनी आमदार बाळासाहेब पाटील यांचा विजयाचा षटकार राेखत विजय संपादन केला. भाजपने प्रचाराचे केलेले नियोजन, युवा वर्गाचा मोठा उत्स्फूर्त सहभाग, लाडकी बहीण योजनेसह विविध योजनांचा प्रभाव, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रचाराचा प्रभाव मतदारांवर चांगलाच पडला, बटेंगे तो कटंगे, एक है तो सेफ है, यासह हिंदुत्वाचा विचार मतदारांना चांगलाच भावला. आमदार पाटील यांची २५ वर्षाची कारकीर्द थोपवण्यास भाजपला यश आले. मतमोजणीच्या २३ व्या फेऱीअखेर मनोज घोरपडे यांना १२०८८७ मते, तर बाळासाहेब पाटील यांना ८०४७५ इतकी मते पडली.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे भाजपचे अधिकृत उमेदवार मनोज घोरपडे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार बाळासाहेब पाटील यांच्यातील लढत प्रारंभीपासूनच चुरशीची मांडली जात होती. संपूर्ण मतदारसंघात दोन्ही उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावला होता. दोन्हीही उमेदवारानी सांगता प्रचार सभेद्वारे जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. तुलनेत भाजपने प्रारंभी पासूनच प्रचाराचा जोर लावला होता. तो शेवटपर्यंत तसाच टिकविला. भाजपने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मसूरला प्रचारसभा झाली. त्याचाही चांगलाच प्रभाव मतदारावर झाला. भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांनी अंगावर घेतलेली प्रचाराची धुरा कार्यक्षमपणे शर्थीने राबवली.
पाणी प्रश्नावरही निवडणुकीतला प्रचार गाजला. हणबरवाडी-धनगरवाडी पाणी उपसा सिंचन योजनेच्या श्रेयवादाचा मुद्दाही तितकाच कळीचा ठरला. आमदार बाळासाहेब पाटील यांनी योजनेचा दावा ठासून प्रचार सभेत मांडला होता. आपण मतदार संघात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा तितकाच प्रभावीपणे मांडला होता. यशवंत विचार राबवला जात असल्याचा विश्वास मतदारांच्यावर ठसवला होता. सह्याद्री कारखानाच्या माध्यमातून कराड, कोरेगाव, खटाव, सातारा या तालुक्यात जनसंपर्क चांगला होता. आमदार पाटील यांच्यासाठी रहिमतपूरला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रचार सभेचे नियोजन केले होते. मात्र तांत्रिक अडचणीमुळे सभेला त्यांना उपस्थिती दर्शवता आली नाही. मात्र हाच मुद्दा भाजपने प्रचार सभेत मोठ्या हुशारीने मांडला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते हिरहिरीने प्रचारात उतरले होते. कारखान्याच्या संचालकांची, कार्यकर्त्यांची फळी जोमाने काम करत होती. तरी देखील या निवडणुकीत त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले. त्यांना विजयाचा षटकार मारता आला नाही.
मनोज घोरपडे यांचे प्रचाराचे सुव्यवस्थित नियोजन
भाजपचे उमेदवार मनोज घोरपडे यांनी मतदारसंघात प्रचाराचे नियोजन पहिल्यापासून चांगल्या पद्धतीने राबवले. युवा वर्गाची चांगली फळी त्यांनी कुशलतेने प्रचारासाठी राबवली. युवा वर्गाने घराघरातून मतदान काढले. ती त्यांच्यासाठी फलदायी ठरली. महायुती सरकारने राबवलेल्या लाडकी बहिण योजनेसह विविध योजनांचे काही मुद्दे मतदारांच्यावर प्रभावशील ठरले. हणबरवाडी-धनगरवाडी यासह उरमोडी, टेंभू योजनेचे मुद्देही प्रचारात त्यांनी आणले. त्याचाही प्रभाव मतदारांवर पडला. यासह अनेक कारणे मनोज घोरपडे यांच्या विजयामागे असल्याचे दिसते.
पाटील यांना आत्मपरीक्षण करावे लागणार
आमदार बाळासाहेब पाटील यांची या निवडणुकीत सहावी टर्म होती. विजयाचा षटकार ठोकायचा होता. निवडणुकीतले अंदाज, आडाखे, नियोजन बांधण्यात ते माहीर आहेत. मतदार संघात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. चांगली विकास कामेदेखील राबवली आहेत. त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे चांगले पदाधिकारीही आहेत. त्यांनी प्रचार यंत्रणा चांगली राबवली होती. या बाबी असताना देखील त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. निवडणुकीबाबत नेमके आपण कुठे कमी पडलो याबाबत त्यांना आत्मपरीक्षण करावे लागणार आहे.