(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
Alia Bhatt-Ranbir Kapoor: बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणजे अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट. या दोघांची मुलगी राहा कपूरदेखील आपल्या क्यूट अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. नुकताच रणबीर आणि आलियाने राहाचा चौथा वाढदिवस साजरा केला होता. या सेलिब्रेशनचे खास फोटो शेअर केल्यानंतर आता आलियाने त्यांच्या दिवाळी सेलिब्रेशनची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. यंदा कपूर कुटुंबाने त्यांच्या नव्या ‘कृष्णा राज’ बंगल्यात पहिली दिवाळी साजरी केली. या सेलिब्रेशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर नोव्हेंबर २०२५ मध्ये मुंबईतील वांद्रे येथील पाली हिल परिसरात असलेल्या त्यांच्या नव्या सहा मजली ‘कृष्णा राज’ बंगल्यात राहायला गेले. या घरात ते मुलगी राहा आणि रणबीरची आई नीतू कपूर यांच्यासोबत राहतात. यंदाची दिवाळी या घरातील त्यांची पहिली दिवाळी असल्याने हे सेलिब्रेशन त्यांच्यासाठी खास ठरले. आलियाने सोशल मीडियावर दिवाळी सेलिब्रेशनचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
राहाने आई-बाबांवर केला प्रेमाचा वर्षाव
आलियाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये राहा आपल्या आई-वडिलांसोबत मस्ती करताना दिसत आहे. एका फोटोमध्ये राहा आलिया आणि रणबीरचे गोड पापे घेताना दिसते. हा फोटो चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये राहा वडील रणबीरच्या मांडीवर बसून पूजा करताना दिसत आहे. रणबीरच्या हातात पवित्र धागा बांधला जात असताना आलिया हसताना दिसते. या खास क्षणांमधून कपूर कुटुंबातील आनंद आणि जिव्हाळा पाहायला मिळतो.
आलियाने दिवाळी पूजेची झलकही या फोटोंमधून दाखवली आहे. फोटो समोर येताच चाहत्यांनी त्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. राहाचे आई-वडिलांसोबतचे गोड क्षण पाहून अनेकांनी कमेंट्समधून तिचे कौतुक केले आहे.
दिवाळीत रस्त्याच्या कडेला बसून अभिनेत्याने विकल्या फुलांच्या माळा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!
या खास सेलिब्रेशनसाठी आलियाने पिस्ता हिरव्या रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला होता. त्यासोबत राजस्थानी आंगी ब्लाउज, लांब श्रग आणि जुळणारा दुपट्टा असा तिचा पारंपरिक लूक होता. माथा पट्टी आणि मोठ्या आकाराच्या कानातल्यांनी तिने आपला लूक पूर्ण केला होता.
तर रणबीर कपूर आयव्हरी रंगाच्या सिल्क कुर्त्यामध्ये देखणा दिसत होता. राहानेही वडिलांच्या लूकला मॅच करणारा लेहेंगा परिधान केला होता. तिघांचे हे पारंपरिक लूकमधील फोटो चाहत्यांना विशेष आवडले आहेत. आलिया-रणबीरच्या नव्या घरातील पहिल्या दिवाळीचे हे खास क्षण सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.






