
फोटो सौजन्य - Social Media
अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाण दोघेही येत्या 24 तारखेला लग्न हुरकणार आहेत. दोघेही छत्रपती संभाजीनगर येथे विवाहबंधन बांधणार आहेत. ‘कारभारी लयभारी’ मालिकेतून सुरु झालेल्या या प्रेमप्रकरणाला आता नवी आणि योग्य दिशा मिळणार आहे. लग्नाची लगबग सुरु झाली असून या मालिकेच्या चाहत्यांमध्ये आकर्षक असा उत्साह दिसून येत आहे.
‘सरकटे Weds चव्हाण’ चर्चेत आली पत्रिका!
आत्मराम सरकटेंची नात तसेच संजय सरकटेंची जेष्ठ कन्या अभिनेत्री अनुष्का सरकटे येत्या 24 जून 2026 ला सांगलीचा पठ्ठ्या निखिल चव्हाण-देशमुखशी लग्न करणार आहे. ‘तुझीच रे’ या मालिकेतून अनुष्काने मालिका विश्वात पदार्पण केले. पुढे ‘कारभारी लयभारी’, ’36 गुणी जोडी’ तसेच ‘श्री लक्ष्मी नारायण’ या मालिकेत तिने अफलातून अभिनय करत मराठी प्रेक्षकांमध्ये विशेष नाव कमावले. ‘कारभारी लयभारी’ या प्रसिद्ध मालिकेत ती निखिल चव्हाणसह मुख्य भूमिकेत झळकली होती. निखिल सध्या ‘ऑल द बेस्ट’ हे नाटक रंगभूमीवर गाजवत आहे.
चाहत्यांमध्ये उत्सुकता!
हा लग्नसोहळा फक्त निखिल आणि अनुष्काच्या चाहत्यांपुरती मर्यादित नाही. मुळात, या जोडीने ‘कारभारी लयभारी’ मालिकेची छाप मराठी मालिका प्रेक्षकांमध्ये सोडली आहे. त्यामुळे या मालिकेच्या चाहत्यांमध्येदेखील फार उत्साहाचे वातावरण आहे. सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी प्रतिसाद दिला आहे. अनेक जणांनी ‘आमची आवडती जोडी!’ असा प्रतिसाद दिला आहे. एकंदरीत, अखेर लग्न ‘सरकटे Weds चव्हाण-देशमुख’ यांचं आहे, चर्चा तर होणारच!