( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेता सयाजी शिंदे हे केवळ त्यांच्या अभिनयासाठीच नव्हे, तर सामाजिक आणि पर्यावरणीय कार्यांसाठीही ओळखले जातात. नुकतीच त्यांच्या आयुष्यातील एक भावनिक आणि प्रेरणादायी गोष्ट पुन्हा चर्चेत आली आहे. आईवरील प्रेमातून सुरू झालेला त्यांचा एक संकल्प आज महाराष्ट्रभरातील लाखो झाडांच्या रूपाने फुलताना दिसत आहे.
2016 साली सयाजी शिंदे यांच्या 92 वर्षीय आईच्या वाढत्या वयामुळे ते भावूक झाले होते. आई एक दिवस आपल्याला सोडून जाईल, हा विचार त्यांना सतावत होता. मात्र, आईच्या आठवणी कायमस्वरूपी जपण्यासाठी त्यांनी एक वेगळाच मार्ग निवडला. त्यांनी आपल्या आईला सांगितले की, “तुला कायमचं जिवंत ठेवण्याची ताकद माझ्यात नाही. पण तुझ्या वजनाइतक्या बिया गोळा करून त्या महाराष्ट्रभर पेरणार आहे. त्या बियांपासून जेव्हा झाडे उभी राहतील, त्यांना फुले, फळे आणि सावली मिळेल, तेव्हा त्यांच्या सुगंधात मला तुझं अस्तित्व जाणवेल. अशा प्रकारे तू कायम माझ्यासोबत राहशील.”
या भावनिक वचनातून सुरू झालेला प्रवास पुढे एका मोठ्या पर्यावरण मोहिमेत बदलला. गेल्या काही वर्षांत सयाजी शिंदे यांनी महाराष्ट्रातील तब्बल 48 ठिकाणी 6.5 लाखांहून अधिक झाडे लावण्यास हातभार लावला आहे. त्यातील अनेक झाडे आज मोठी होऊन घनदाट वनांमध्ये रूपांतरित झाली आहेत.
या उपक्रमाला पुढे ‘सह्याद्री देवराई’ असे नाव देण्यात आले. विशेष म्हणजे, हा संपूर्ण उपक्रम त्यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ सुरू केला.
View this post on Instagram
या झाडांमुळे केवळ हरित परिसर निर्माण झाला नाही, तर स्थानिक परिसंस्थेलाही मोठा आधार मिळाला आहे. अनेक ठिकाणी पक्षी, प्राणी आणि इतर जीवांसाठी आश्रय निर्माण झाला असून पर्यावरण संवर्धनाला चालना मिळाली आहे. झाडांची फळे, सावली आणि त्यातून निर्माण होणारे स्वच्छ वातावरण भावी पिढ्यांसाठीही महत्त्वाचे ठरत आहे.
View this post on Instagram
सयाजी शिंदे यांचा हा उपक्रम आईवरील प्रेमाची एक अनोखी श्रद्धांजली मानली जाते. एका मुलाने आईला दिलेलं वचन केवळ पूर्णच केलं नाही, तर त्यातून समाजालाही पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वाचा संदेश दिला. त्यामुळे आजही त्यांची ही कहाणी अनेकांना प्रेरणा देत आहे.






