(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Chaar Yaar Trailer: प्राइम व्हिडीओने आपल्या आगामी हिंदी ओरिजिनल सीरिज ‘चार यार’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित केला आहे. २००० च्या दशकातील मुंबईच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही सीरिज चार जिवलग मित्रांची कहाणी सांगते. मैत्री, महत्त्वाकांक्षा, विनोद, वेगवान कार चेस आणि गुन्हेगारी विश्वातील थरार अशा अनेक गोष्टींची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. एका अनपेक्षित प्रसंगामुळे गुन्हेगारीच्या जगात अडकलेल्या चार मित्रांचा पुढील प्रवास कसा असेल, याची उत्सुकता या ट्रेलरमुळे वाढली आहे.
‘चार यार’ची कथा २००० च्या दशकाच्या सुरुवातीच्या मुंबईत घडते. जय, टोनी, साहिल आणि समीर हे चार जिवलग मित्र मध्यमवर्गीय आयुष्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न पाहतात. मात्र, एका कठीण प्रसंगात घेतलेला निर्णय त्यांच्या आयुष्याला अनपेक्षित वळण देतो.
या निर्णयामुळे त्यांचं साधंसुधं आयुष्य गुन्हेगारी, गँगस्टर्स आणि मोठ्या चोऱ्यांच्या धोकादायक जगात अडकतं. परिस्थिती हाताबाहेर जात असताना त्यांना मुंबईच्या अंडरवर्ल्डचा सामना करावा लागतो. त्यातच इन्स्पेक्टर सुमित भालेराव त्यांचा माग काढत असल्याने त्यांच्यासमोरील आव्हानं आणखी वाढतात.
एकामागून एक फसणाऱ्या योजना, वेगवान कार चेस आणि जीवघेण्या प्रसंगांमधून मार्ग काढताना या चार मित्रांची मैत्री किती टिकून राहते, हे सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे.
पूरव झा, साकिब अयूब यांच्यासह दमदार कलाकारांची फौज
या सीरिजमध्ये पूरव झा, नमन जैन, साकिब अयूब आणि प्रयारक मेहता प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यांच्यासोबत साई ताम्हणकर, सिकंदर खेर, दिव्येंदु भट्टाचार्य, राजेश तैलंग, चंकी पांडे आणि भगवती पेरुमल हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.
आठ भागांच्या या सीरिजचं दिग्दर्शन विनय वैकुल यांनी केलं आहे, तर संबित मिश्रा आणि सौरभ सावंत यांनी लेखन केलं आहे. पिंक विंडो प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली प्रणती नागरशेठ, नीरज नागरशेठ आणि पी. एस. श्याम यांनी निर्मिती केली आहे. बीबीसी स्टुडिओज इंडियाने ही सीरिज विकसित केली आहे.
‘चार यार’बद्दल दिग्दर्शक विनय वैकुल काय म्हणाले?
सीरिजचे दिग्दर्शक विनय वैकुल यांनी ‘चार यार’च्या संकल्पनेबद्दल सांगितलं की, आयुष्यातील अनिश्चितता आणि अचानक उद्भवणाऱ्या संकटांचा सामना करताना मैत्री किती महत्त्वाची ठरते, हे या कथेतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
चार मित्रांच्या आयुष्यात अचानक घडणाऱ्या घटनांमुळे त्यांना अशा संकटांचा सामना करावा लागतो, ज्याची त्यांनी कल्पनाही केलेली नसते. या प्रवासात त्यांची वेगवेगळी व्यक्तिमत्त्वं कधी एकमेकांशी भिडतात, तर कधी एकमेकांना आधार देतात. या नात्यांमधील चढ-उतार हीच या सीरिजची खासियत असल्याचं त्यांनी सांगितलं.
जयची भूमिका साकारणारा प्रयारक मेहता याने ही व्यक्तिरेखा त्याच्या आधीच्या भूमिकांपेक्षा वेगळी असल्याचं सांगितलं. जय कमी बोलणारा, विचारपूर्वक निर्णय घेणारा आणि प्रत्येक परिस्थितीसाठी योजना तयार ठेवणारा आहे. मात्र, त्याची समजूतदारपणाची वृत्तीच काही प्रसंगी त्याची कमजोरी ठरू शकते, असं प्रयारकने स्पष्ट केलं.
टोनीची भूमिका साकारणाऱ्या साकिब अयूबनेही या सीरिजमधील अॅक्शन सीन्स, कार चेस आणि रात्रीच्या चित्रीकरणाचा अनुभव खास असल्याचं सांगितलं. तर साहिलची भूमिका साकारणाऱ्या पूरव झासाठी ही सीरिज अभिनयाच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. समीरची भूमिका साकारणाऱ्या नमन जैनने आपल्या व्यक्तिरेखेतील विनोदी स्वभाव आणि तणावपूर्ण प्रसंगांमध्येही हसण्याची वृत्ती याबद्दल उत्सुकता व्यक्त केली.
कधी आणि कुठे पाहता येणार ‘चार यार’?
‘चार यार’ या सीरिजचा प्रीमियर २३ ऑक्टोबर २०२६ रोजी प्राइम व्हिडीओवर होणार आहे. ही सीरिज भारतासह जगभरातील २४० हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये हिंदी भाषेत प्रदर्शित केली जाणार आहे.
मैत्री, गुन्हेगारी, अॅक्शन आणि विनोद यांचा संगम असलेल्या या सीरिजमध्ये चार मित्र संकटातून बाहेर पडण्यासाठी काय करतात आणि त्यांची मैत्री या कठीण प्रवासात त्यांना कितपत साथ देते, हे पाहणं रंजक ठरणार आहे.






