(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Drishyam 3 Cast Fees:: बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या बहुचर्चित ‘दृश्यम’ फ्रँचायझीचा तिसरा भाग आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘दृश्यम: द कन्क्लुजन’ हा चित्रपट शुक्रवार, २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळत असून, विजय साळगावकर आपल्या कुटुंबाला यावेळी कसं वाचवणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
मागील दोन भागांमध्ये विजय साळगावकरच्या हुशारीने प्रेक्षकांना शेवटच्या क्षणापर्यंत खिळवून ठेवलं होतं. आता तिसऱ्या आणि अंतिम भागात कथेला कोणतं वळण मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अभिषेक पाठक दिग्दर्शित ‘दृश्यम: द कन्क्लुजन’चं बजेट सुमारे १३० कोटी रुपये असल्याचं वृत्त आहे. दरम्यान, चित्रपटातील कलाकारांच्या मानधनाचीही चर्चा सुरू झाली आहे.
‘टाइम्स नाऊ’च्या वृत्तानुसार, अजय देवगणने या भागासाठी आपले मानधन कमी केल्याचं सांगितलं जात आहे. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम २’साठी अजयने कथितरित्या ३० कोटी रुपये मानधन घेतले होते. मात्र, ‘दृश्यम: द कन्क्लुजन’साठी त्याला अंदाजे १८ ते २२ कोटी रुपये मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मात्र, कलाकारांच्या मानधनाबाबत निर्मात्यांकडून अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे हे आकडे वृत्तांवर आधारित आहेत.
तब्बूला किती मिळालं मानधन?
‘दृश्यम’ फ्रँचायझीमध्ये अजय देवगणसोबत अभिनेत्री तब्बूची भूमिकाही महत्त्वाची आहे. ती चित्रपटात मीरा देशमुखची भूमिका साकारत आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, तब्बूला ‘दृश्यम: द कन्क्लुजन’साठी अंदाजे २.५ ते ३.५ कोटी रुपये मानधन मिळत असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या आकड्यांनाही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
‘दृश्यम’च्या दोन्ही भागांमध्ये विजय साळगावकर आणि मीरा देशमुख यांच्यातील संघर्ष हा कथेचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी विजय प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकताना दिसला आहे.
आता तिसऱ्या भागात विजयसमोर कोणतं नवं संकट उभं राहणार आणि तो त्यातून कसा मार्ग काढणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे, मीरा देशमुख विजयपर्यंत पोहोचणार का, याचं उत्तरही चित्रपटात मिळणार आहे.
‘दृश्यम: द कन्क्लुजन’ २ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून, हा या फ्रँचायझीचा अंतिम भाग असल्याचं सांगितलं जात आहे.






