( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Home Minister New Season: महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला आणि प्रेक्षकांच्या मनात आपलं खास स्थान निर्माण केलेला ‘होम मिनिस्टर’ हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम नसून, महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या आयुष्यात आनंद आणि आत्मविश्वास घेऊन आलेला प्रवास आहे. तब्बल २० वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा हा लोकप्रिय कार्यक्रम आता नव्या रूपात आणि नव्या विचारांसह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कार्यक्रमाच्या पुनरागमनाची घोषणा होताच पहिल्याच आठवड्यात १५ हजारांहून अधिक प्रवेशिका मिळाल्या आहेत.
२० वर्षांच्या या प्रवासात ‘होम मिनिस्टर’ने महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यात प्रवास केला. आदेश बांदेकर यांनी असंख्य घरांना भेटी देत विविध शहरं, गावं आणि कुटुंबांपर्यंत कार्यक्रम पोहोचवला. या काळात जवळपास २५ लाख किलोमीटरचा प्रवास कार्यक्रमाच्या निमित्ताने झाला. या प्रवासात अनेक कुटुंबांच्या खास आठवणी ‘होम मिनिस्टर’चा भाग बनल्या. बहिणी पुन्हा एकमेकींना भेटल्या, तर काही विभक्त कुटुंबांमध्ये पुन्हा आनंदाचं वातावरण निर्माण झालं. प्रत्येक घराची वेगळी गोष्ट आणि प्रत्येक ‘वहिनी’चा वेगळा संघर्ष या कार्यक्रमाने जवळून अनुभवला.
२० वर्षांत ७,५०० पैठण्यांचा सन्मान
‘होम मिनिस्टर’च्या या २० वर्षांच्या प्रवासात ‘वहिनींना’ सुमारे ७,५०० पैठण्या भेट म्हणून देण्यात आल्या. पैठणीला ‘महाराष्ट्राचा महासन्मान’ आणि ‘महाराष्ट्राची अस्मिता’ अशी ओळख मिळवून देण्यात कार्यक्रमाचा मोठा वाटा राहिला आहे.
प्रत्येक वहिनीच्या कपाटात पैठणी असेलच असं नाही; मात्र स्वतःच्या मेहनतीने आणि खेळ जिंकून मिळवलेली पैठणी तिच्यासाठी अभिमानाची गोष्ट ठरली. ‘महामिनिस्टर’ या विशेष पर्वात अंतिम विजेत्या वहिनीला तब्बल ११ लाख रुपयांची पैठणी देण्यात आली होती.
या प्रवासादरम्यान सुमारे २० ते २५ हजार महिलांच्या आयुष्यात कार्यक्रमाने आनंदाचे क्षण आणल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘होम मिनिस्टर’ने आदेश बांदेकर यांना महाराष्ट्राचा ‘भाऊजी’ अशी ओळख मिळवून दिली. आदेश बांदेकर आणि ‘होम मिनिस्टर’चं महाराष्ट्रातील प्रत्येक घराशी जुळलेलं नातं आजही तितकंच खास आहे.
आपल्या या प्रवासाबद्दल बोलताना आदेश बांदेकर म्हणाले, “होम मिनिस्टरच्या या प्रवासात महाराष्ट्राच्या असंख्य घरांमध्ये जाण्याची, तिथल्या वहिनींना भेटण्याची आणि त्यांच्या आयुष्यातले खास क्षण अनुभवण्याची संधी मला मिळाली. हा प्रवास माझ्यासाठी फक्त कार्यक्रमाचा प्रवास नव्हता, तर तो माणसांचा आणि नात्यांचा प्रवास होता.”
ते पुढे म्हणाले, “प्रत्येक वहिनीची आपली एक गोष्ट होती, तिचं एक स्वप्न होतं. त्या घरांमध्ये जाणं, त्यांच्या कुटुंबाला भेटणं आणि त्यांच्या सुख-दुःखाचा भाग होणं मला खूप आवडायचं. गेली दोन वर्षं मी हे सगळं खूप मिस केलं. या कार्यक्रमाला मी खूप मिस केलं. पुन्हा एकदा त्यांच्या घरी जाण्याची, त्यांच्या आयुष्यातला आनंद जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे, याचा मला खूप आनंद आहे.”
‘होम मिनिस्टर’च्या पुनरागमनाची घोषणा होताच पहिल्याच आठवड्यात १५ हजारांहून अधिक प्रवेशिका मिळाल्या. या उत्स्फूर्त प्रतिसादातून कार्यक्रमाशी जोडलेलं प्रेक्षकांचं नातं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.
एका महिलेने ‘होम मिनिस्टर’ची सुंदर व्याख्या करताना म्हटलं, “होम मिनिस्टर म्हणजे सर्वसामान्य स्त्रीला आत्मविश्वास देणारा कार्यक्रम.”
याच विचाराला नव्या पर्वात आणखी व्यापक रूप दिलं जाणार आहे. यावेळी केवळ घर सांभाळणाऱ्या स्त्रीचा नव्हे, तर घर आणि संसार सांभाळतानाच स्वतःच्या कर्तृत्वाची नवी वाट तयार करणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा सन्मान केला जाणार आहे.
गृहउद्योग करणारी महिला असो, नोकरीसाठी दररोज घराबाहेर पडणारी स्त्री असो किंवा कुटुंबाच्या प्रगतीसाठी पतीच्या किंवा सासूच्या पाठीशी ठामपणे उभी राहणारी महिला असो, तिच्या कष्टांचा, विचारांचा आणि योगदानाचा सन्मान या नव्या पर्वात केला जाणार आहे.
‘प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो’ ही म्हण आपण अनेकदा ऐकतो. मात्र, त्या स्त्रीच्या कर्तृत्वाचा, मेहनतीचा आणि स्वप्नांचा गौरव करणं हीच ‘होम मिनिस्टर’च्या नव्या पर्वाची खासियत असणार आहे.
घरासाठी जगताना स्वतःसाठी एक पाऊल पुढे टाकणाऱ्या सर्वसामान्य महिलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी ‘होम मिनिस्टर’ पुन्हा सज्ज झाला आहे. ‘घरासाठी उंबरठा ओलांडायचं ठरलंय, पाऊल पुढे पडलंय!’ या विचारासह नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे.





