
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
करीना कपूरचा जन्म २१ सप्टेंबर १९८० रोजी कपूर कुटुंबात झाला. ती राज कपूर यांची नात आणि रणधीर कपूर व बबिता कपूर यांची मुलगी आहे.
करीना यांचं नाव सुरुवातीला ‘सिद्धिमा’ ठेवण्यात आलं होतं. मात्र, तिची आई बबिता यांनी नंतर तिचं नाव बदलून ‘करीना’ ठेवलं. ‘अण्णा कॅरेनिना’ या पुस्तकापासून प्रेरणा घेऊन हे नाव निवडल्याचं सांगितलं जातं.
अभिनयासाठी अर्धवट सोडलं शिक्षण
करीनाचं सुरुवातीचं शिक्षण मुंबईतील जमनाबाई नरसी स्कूल आणि डेहराडूनमधील वेल्हम गर्ल्स स्कूलमध्ये झालं. त्यानंतर तिने मुंबईतील मिठीबाई कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. मात्र, तिने पदवी पूर्ण केली नाही.
तिने हार्वर्ड समर स्कूलमध्ये तीन महिन्यांचा मायक्रो कॉम्प्युटर कोर्सही केला होता. त्यानंतर मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्येही तिने प्रवेश घेतला. मात्र, अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी तिने शिक्षण अर्धवट सोडलं.करीनाने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, तिचं शिक्षण ११वीपर्यंतच झालं आहे.
करीनाच्या बॉलिवूड पदार्पणाची कहाणीही तितकीच रंजक आहे. दिग्दर्शक राकेश रोशन हे त्यांचा मुलगा हृतिक रोशन आणि करीना कपूर यांना ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून लॉन्च करणार होते. करीनाने या चित्रपटाचं शूटिंगही सुरू केलं होतं आणि काही दृश्यांचं चित्रीकरण झालं होतं.
मात्र, चित्रपटाच्या पटकथेवरून आणि करीनाच्या भूमिकेला मिळणाऱ्या महत्त्वावरून तिची आई बबिता आणि राकेश रोशन यांच्यात मतभेद झाल्याचं सांगितलं जातं. बबिता यांना चित्रपटात हृतिकच्या भूमिकेला अधिक महत्त्व दिलं जात असल्याचं वाटत होतं. त्यामुळे त्यांनी करीनाला या प्रोजेक्टमधून बाहेर काढलं.
यानंतर करीनाला जे. पी. दत्ता यांच्या ‘रिफ्युजी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात ती अभिषेक बच्चनसोबत दिसली.
विशेष म्हणजे, ‘कहो ना प्यार है’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि अमिषा पटेल रातोरात लोकप्रिय झाली. दुसरीकडे ‘रिफ्युजी’ला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळालं नाही.
करीना म्हणावी का ‘रिजेक्शन क्वीन’?
करीनाने आपल्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांना नकार दिला आहे. विशेष म्हणजे, यातील काही चित्रपट नंतर मोठे हिट ठरले. ‘कहो ना प्यार है’, ‘कल हो ना हो’, ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ आणि ‘चेन्नई एक्सप्रेस’ यांसारख्या चित्रपटांचा यात समावेश होतो.
करीनाने हे चित्रपट केले असते तर तिच्या फिल्मी कारकिर्दीचा प्रवास आणखी वेगळा दिसला असता. मात्र, तिने निवडलेल्या भूमिका आणि तिच्या अभिनयामुळे आज बॉलिवूडमध्ये तिचं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण झालं आहे.