(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
कसाबने अमिताभ बच्चन यांच्याबद्दल काय सांगितलं?
कसाबने मुंबईत येण्यामागचं कारण काय सांगितलं?
कसाबने स्वतःला अल्पवयीन असल्याचा केला होता दावा
KBC 18 : ‘कौन बनेगा करोडपती 18’चा मंच सध्या चर्चेत आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या ‘प्रहार – द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ या विशेष भागात ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यासोबत अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री वामिका गब्बी हे विशेष पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. यावेळी उज्ज्वल निकम यांनी 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यादरम्यान अजमल कसाबच्या चौकशीशी संबंधित एक किस्सा सांगितला.
उज्ज्वल निकम यांनी सांगितल्यानुसार, अजमल कसाबच्या चौकशीदरम्यान त्याने मुंबईत येण्यामागचं कारण सांगितलं होतं. कसाबने आपण हिंदी चित्रपटांचा चाहता असून अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी आणि त्यांचं घर पाहण्यासाठी मुंबईत आलो होतो, असा दावा केल्याचं निकम यांनी सांगितलं.
कसाबच्या या कथित दाव्याचा उल्लेख होताच अमिताभ बच्चन यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. “जर कसाब आमच्या घरी आला असता, तर तो तिथून परत गेला नसता. मी त्याला तिथेच गोळ्या झाडल्या असत्या,” अशा शब्दांत बिग बींनी प्रतिक्रिया दिल्याचं समोर आलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर कार्यक्रमातील वातावरण काही क्षण गंभीर झाल्याचं पाहायला मिळालं.
View this post on Instagram
उज्ज्वल निकम यांनी पुढे कसाबच्या चौकशीदरम्यान त्याने तपास यंत्रणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचाही उल्लेख केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, कसाबने सुरुवातीला 26/11 मुंबई हल्ल्याच्या संदर्भात आपल्याला अटक करण्यात आली नसल्याचं सांगितलं होतं. त्याला 6 नोव्हेंबर रोजी जुहू चौपाटीवरून पकडण्यात आल्याचा दावा त्याने केला होता.
याशिवाय कसाबने आपण अल्पवयीन असल्याचाही दावा केल्याचं निकम यांनी सांगितलं. त्यामुळे त्याच्या वयाबाबत कायदेशीर प्रश्न निर्माण झाला होता. त्याचं खरं वय निश्चित करण्यासाठी वैद्यकीय चाचण्याही करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याशी संबंधित या आठवणी उज्ज्वल निकम यांनी ‘KBC 18’च्या विशेष भागात सांगितल्याने हा एपिसोड चर्चेत आला आहे.






