(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Madhuri Dixit: दिवाळीचा सण सुरू झाला असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. बॉलिवूडमध्येही दिवाळी पार्टींची धूम सुरू झाली आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी ५ नोव्हेंबर रोजी आपल्या घरी खास दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी कुटुंबासह हजेरी लावली. अभिनेत्री माधुरी दीक्षितही पती डॉ. श्रीराम नेने आणि मोठा मुलगा आरिनसोबत या पार्टीत पोहोचली होती. मात्र, यावेळी माधुरीसोबत तिच्या मुलाची कथित गर्लफ्रेंडही दिसल्याने सर्वांचे लक्ष तिच्याकडे वेधले गेले. आरिनसोबत तिला पाहून सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. नेटकरी तर माधुरीची होणारी सून कोण, असा प्रश्न विचारत आहेत.
मनीष मल्होत्रा यांच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षित आपल्या कुटुंबासह पोहोचली होती. यावेळी माधुरी, तिचे पती डॉ. श्रीराम नेने, मुलगा आरिन आणि त्याच्यासोबत असलेली कथित गर्लफ्रेंड असे चौघेही एकत्र दिसले. त्यांच्या स्टायलिश अंदाजाने पार्टीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे, आरिनसोबत दिसलेल्या तरुणीला पाहून नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर तिच्याबाबत आणि माधुरीच्या होणाऱ्या सुनेबाबत मजेशीर कमेंट्स केल्या जात आहेत. मात्र, आरिनच्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
गुलाबी साडीतील माधुरीचा ग्लॅमरस अंदाज
माधुरी दीक्षितची पारंपरिक फॅशन नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस उतरते. यावेळीही तिने आपल्या साडी लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीसाठी माधुरीने गडद गुलाबी रंगाची सॅटिन फिनिश साडी नेसली होती. साडीच्या चमकदार कापडामुळे तिचा लूक अधिकच खुलून दिसत होता. साडीच्या काठावर केलेले चांदीच्या आणि पांढऱ्या धाग्यांचे नाजूक भरतकाम तिच्या लूकला खास आकर्षण देत होते.
या साडीसोबत माधुरीने स्लीव्हलेस ब्लाउज परिधान केला होता. दागिन्यांमध्ये तिने हेवी स्टेटमेंट इअररिंग्स आणि डायमंड रिंग्सची निवड केली होती. तसेच मोती आणि क्रिस्टलचे काम असलेली सुंदर पोटली बॅगही तिने कॅरी केली होती. मोकळे कुरळे केस, हलका मेकअप आणि चेहऱ्यावरील गोड हास्य यामुळे माधुरीचा संपूर्ण लूक खुलून दिसत होता.
या पार्टीत माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने यांनीही आपल्या लूकने लक्ष वेधून घेतले. त्यांनी पांढऱ्या रंगाचा आकर्षक पोशाख निवडला होता. पांढऱ्या रंगाचे भरतकाम असलेले जॅकेट, त्याला मॅचिंग शर्ट आणि सैल पँट असा त्यांचा लूक होता. त्यांचा साधा आणि मोहक अंदाज माधुरीच्या गुलाबी साडीच्या लूकसोबत छान खुलून दिसत होता.
एकीकडे माधुरीच्या सौंदर्याची आणि फॅशनची चर्चा होत आहे, तर दुसरीकडे मुलगा आरिनसोबत दिसलेल्या तरुणीमुळे सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंगली आहे. त्यामुळे माधुरी दीक्षितच्या दिवाळी पार्टीतील हे फॅमिली फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.






