Kon Honar Crorepati: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
मोठी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी परिस्थिती नव्हे, तर जिद्द महत्त्वाची असते, हे जगदीश कांबळे यांनी दाखवून दिलं. सोनी मराठीवरील ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर एका सामान्य डिलिव्हरी बॉयनं आपल्या संघर्षाची आणि विखुरलेल्या कुटुंबाची कहाणी सांगत सर्वांची मनं जिंकली. हा भाग केवळ एका स्पर्धकाचा राहिला नाही, तर तो एका लेकराने मंचावरून आपल्या आईला मारलेली आर्त हाक ठरला. Kon Honar Crorepati:
कोण होणार करोडपतीमध्ये येण्याचं, माधुरी दीक्षित यांना भेटण्याचं आणि त्यांच्यासमोर हॉट सीटवर बसण्याचं जगदीश यांचं स्वप्न होतं. या खास क्षणासाठी त्यांनी मित्राकडून अडीज हजार रुपये उधार घेतले आणि त्यातून चारशे रुपयांचा शर्ट व हजार रुपयांची पॅण्ट आणि हजार रुपयांचे बूट खरेदी केले. मात्र या कपड्यांवर बूट मॅच होत नव्हते म्हणून त्यांना रोजच्याच वापरातली सॅंडल घालून यावं लागलं. ही सॅन्डल सुद्धा फाटकी आहे असं त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं. त्यांचा साधा भोळा स्वभाव आणि प्रामाणिक वक्तव्य ऐकून माधुरी दीक्षित सोबत सगळ्यांचंच मन हेलावलं.
पण जगदीश यांच्या आयुष्यातील संघर्षाची कहाणी एवढ्यापुरतीच मर्यादित नव्हती. गप्पांच्या ओघात त्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत भावूक आणि वेदनादायी पैलू समोर आला. वडिलांच्या त्रासामुळे जगदीश यांची आई त्यांना आणि कुटुंबाला सोडून निघून गेली होती. आईच्या जाण्यानं त्यांच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी आणि तिची उणीव त्यांना प्रत्येक क्षणी जाणवत आहे.
हॉट सीटवर बसून आईची आठवण काढताना जगदीश अत्यंत भावूक झाले. डोळ्यात अश्रू आणून ते म्हणाले, “आज जर माझी आई सोबत असती, तर माझ्या छातीवर तीन स्टार असते…” पुढे थेट कॅमेऱ्याकडे पाहत त्यांनी आपल्या आईला साद घातली, “आई, तू कुठेही असशील आणि हा कार्यक्रम पाहत असशील तर परत ये, मी तुला काही विचारणार ना, काही बोलणार नाही…” जगदीश यांच्या या आर्त हाकेने मंचावर एकच शांतता पसरली आणि उपस्थित प्रत्येकाचं मन हेलावलं.
माधुरी दीक्षित यांनी जगदीश यांच्या साधेपणाचं, प्रामाणिकपणाचं आणि त्यांच्या जिद्दीचं कौतुक केलं. ‘कोण होणार करोडपती’ हा केवळ प्रश्नोत्तरांचा खेळ नसून सामान्यांच्या स्वप्नांना, त्यांच्या वेदनांना आणि भावनांना हक्काचं व्यासपीठ देणारा मंच आहे, हे या भागाने पुन्हा एकदा सिद्ध केले. पहा ‘कोण होणार करोडपती’, सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्त सोनी मराठी आणि सोनी लिव वर.






