
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Mahaveer Karna: महाभारतातील कथा आणि त्यातील व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान राखून आहेत. या महाकाव्यावर आधारित अनेक मालिका आणि चित्रपट यापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आता पुन्हा एकदा महाभारतातील एका महत्त्वाच्या व्यक्तिरेखेची कथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. दक्षिणेतील अभिनेता राघव लॉरेन्स लवकरच ‘महावीर कर्ण’ या चित्रपटातून कर्णाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
‘महावीर कर्ण’ हा चित्रपट महाभारतातील कर्णाच्या जीवनावर आधारित असल्याची माहिती समोर आली आहे. कर्णाच्या व्यक्तिरेखेतील शौर्य, निष्ठा, दानशूरपणा आणि त्यागाची कथा या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटाची निर्मिती रमेश वर्मा करणार आहेत. राघव लॉरेन्स आणि रमेश वर्मा यांनी यापूर्वी ‘काल भैरवा’ या प्रोजेक्टसाठीही एकत्र काम केलं आहे. आता ही जोडी ‘महावीर कर्ण’साठी पुन्हा एकत्र आली आहे.
‘महावीर कर्ण’ हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
याआधी चित्रपटाचा फर्स्ट लूकही प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘पेन मूव्हीज’ने सोशल मीडिया अकाउंटवर राघव लॉरेन्स यांच्या कर्णाच्या भूमिकेतील पहिली झलक शेअर केली होती. या लूकमध्ये राघव लॉरेन्स दमदार अंदाजात दिसत असून, त्यांच्या भूमिकेबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
कर्णाची कथा पाहण्याची उत्सुकता
महाभारतातील कर्ण ही अत्यंत महत्त्वाची आणि गुंतागुंतीची व्यक्तिरेखा मानली जाते. त्याचा संघर्ष, पराक्रम, निष्ठा आणि आयुष्यातील अनेक चढ-उतार यामुळे कर्णाची कथा कायमच चर्चेत राहिली आहे.
आता राघव लॉरेन्स ही व्यक्तिरेखा मोठ्या पडद्यावर कशा पद्धतीने साकारतात, याची उत्सुकता चाहत्यांना आहे. ‘महावीर कर्ण’च्या माध्यमातून महाभारतातील ही कथा पॅन-इंडिया प्रेक्षकांसमोर येणार आहे.