( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Sahal Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेत्री देविका दफ्तरदार लवकरच एका महत्त्वपूर्ण भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आगामी मराठी चित्रपट ‘सहल’मध्ये त्या ‘आई’ची भावस्पर्शी भूमिका साकारत आहेत. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर लॉन्च करण्यात आलं असून, ९ ऑक्टोबरला ‘सहल’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
देविका दफ्तरदार साकारणार ‘आई’ची भूमिका
देविका दफ्तरदार यांनी आजवर विविध चित्रपटांमधून संवेदनशील आणि लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. ‘सहल’मध्येही त्यांच्या अभिनयाची वेगळी बाजू पाहायला मिळणार आहे. ‘आई’ या भूमिकेतून त्या नेमकं कोणतं भावविश्व उभं करतात आणि चित्रपटातील इतर व्यक्तिरेखांशी त्यांचं नातं कसं उलगडत जातं, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘सहल’मध्ये देविका दफ्तरदार यांच्यासोबत सिद्धेश मुकुंद खुपेरकर, कल्याणी अडसुळ, आदित्य खुपेरकर आणि सागर कोळी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिद्धेश मुकुंद खुपेरकर या चित्रपटातून मुख्य नायक म्हणून पदार्पण करत आहे.
सिद्धेशने यापूर्वी झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये लहान राणाच्या भावाची म्हणजेच सुरजची भूमिका साकारली होती. याशिवाय त्याने डॉ. केशव हेगडेवार यांची बालभूमिकाही साकारली आहे.
के. स्वामिनी फिल्म प्रॉडक्शनच्या बॅनरखाली ‘सहल’ची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन मुकुंद वसंत खुपेरकर यांनी केलं आहे. प्रशांत केसरकर आणि विलास केसरकर हे चित्रपटाचे निर्माते असून, मुकुंद वसंत खुपेरकर सहनिर्माते आहेत. मूळ पटकथाही मुकुंद वसंत खुपेरकर यांनीच लिहिली आहे.
चित्रपटाचे छायांकन अभिषेक शेटे यांनी केलं असून, संकलनाची जबाबदारी चंद्रशेखर गुरव यांनी सांभाळली आहे.
‘सहल’मधील गीतं सुहास मुंढे आणि समीर पठाण यांनी लिहिली आहेत. डॉ. जय भीम शिंदे यांनी संगीत दिग्दर्शन केलं असून, सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या आवाजात चित्रपटातील गीतं स्वरबद्ध करण्यात आली आहेत.
मुकुंद वसंत खुपेरकर यांनी कार्यकारी निर्माता म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. श्रेय चव्हाण यांनी वेशभूषा, आदित्य चव्हाण यांनी ध्वनिसंयोजन, तर प्रशांत कुंभार यांनी कला दिग्दर्शन केलं आहे.
देविका दफ्तरदार यांची संवेदनशील भूमिका आणि सिद्धेश खुपेरकरचं मुख्य नायक म्हणून होणारं पदार्पण यामुळे ‘सहल’ या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. आता ९ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर त्याला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.






