( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Mahira Khan Pregnancy: बॉलिवूडचा ‘किंग’ शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटातून भारतीय प्रेक्षकांच्या मनात आपली ओळख निर्माण करणारी पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान दुसऱ्यांदा आई होणार आहे. वयाच्या ४१व्या वर्षी माहिराने तिच्या प्रेग्नन्सीची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सोशल मीडियावर बेबी बंप फ्लॉन्ट करत तिने ही आनंदाची बातमी जाहीर केली.
माहिरा खानने सोशल मीडियावर बेबी बंपचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री एका पडद्यामागे उभी असून तिचा बेबी बंप स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. पांढऱ्या रंगाच्या पोशाखातील माहिराचा हा फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. या खास फोटोसोबत तिने दुसऱ्यांदा आई होणार असल्याची अधिकृत घोषणा केली.
माहिराच्या या पोस्टनंतर चाहते आणि मनोरंजनविश्वातील मित्रमंडळी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. सोशल मीडियावर तिचा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून, चाहत्यांकडून माहिरा आणि तिचा पती सलीम करीम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
माहिरा खानने २०२३ मध्ये पाकिस्तानी व्यावसायिक सलीम करीमसोबत दुसरं लग्न केलं. लग्नाचे फोटोही तिने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले होते. लग्नानंतर माहिरा आणि सलीम करीम आपल्या वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहेत. आता त्यांच्या आयुष्यात एका नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे.
माहिरा खानचं पहिलं लग्न २००७ मध्ये अली अस्करी यांच्यासोबत झालं होतं. २००९ मध्ये माहिराने मुलगा अझलान अस्करीला जन्म दिला. आता तब्बल १६ वर्षांनंतर अभिनेत्री पुन्हा एकदा आई होणार आहे. त्यामुळे माहिराच्या चाहत्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे.
दरम्यान, माहिरा खानने तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा केल्यानंतर तिच्या वैयक्तिक आयुष्याची ही नवी सुरुवात चर्चेचा विषय ठरली आहे. चाहत्यांकडून माहिरा आणि सलीम करीम यांना नव्या पाहुण्याच्या आगमनासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.






