
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Ashok Saraf Romantic Scene: मराठी मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या अभिनयाची आणि विनोदाची खास शैली आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. अनेक कलाकारांना त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याचा असाच एक मजेशीर किस्सा अभिनेत्री मेघा घाडगेने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे.
मेघा घाडगेने अशोक सराफ यांच्यासोबत एका मालिकेत काम केलं होतं. विशेष म्हणजे, या मालिकेत दोघांनी कपलची भूमिका साकारली होती आणि त्यांच्यात एक रोमँटिक सीनही होता. या सीनच्या वेळी निवेदिता सराफदेखील समोरच बसल्या होत्या. त्यामुळे हा प्रसंग मेघासाठी चांगलाच अवघडल्यासारखा झाला होता.
मेघा घाडगेने सांगितलं की, त्या मालिकेत त्यांना गेस्ट अपिअरन्स म्हणून बोलावण्यात आलं होतं. मालिकेत त्या आणि अशोक सराफ एका कपलची भूमिका साकारत होते. त्यामुळे दोघांचा एक रोमँटिक सीनही होता.
या प्रसंगाबद्दल बोलताना मेघा म्हणाल्या, “अशोक मामा यांच्यासोबत मी एक मालिका केली होती. त्या मालिकेत मला गेस्ट अपिअरन्स म्हणून बोलावण्यात आलं होतं. मालिकेत मी आणि अशोक मामा एक कपल म्हणून भूमिका साकारणार होतो आणि त्यांच्यासोबत माझा एक रोमँटिक सीन होता.”
या सीनच्या वेळी मेघा घाडगेला विशेष संकोच वाटत होता. कारण तिच्या समोरच निवेदिता सराफ बसल्या होत्या. मालिकेतील प्रसंगाची पार्श्वभूमीही तिने सांगितली.
“तेव्हा माझं असं झालं की, अशोक सराफ यांच्यासोबत मी काय सीन करू… माझ्या समोर निवेदिता ताईदेखील होत्या. लावणी कलावंत घरी येणे आणि त्यांचं अफेअर सुरू असतं. त्यावरून त्यांचं त्यांच्या बायकोसोबत भांडण होतं… असा काही तो सीन होता,” असं मेघाने सांगितलं.
अशोक सराफ यांना पहिल्यांदा पाहिल्यानंतरची आठवणही मेघा यांनी शेअर केली. त्या म्हणाल्या की, त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याने आपल्याला खूप विशेष वाटलं.
“जेव्हा मी अशोक सराफ यांना पाहिलं तेव्हा मला असं वाटलं की, मी काहीतरी पुण्यच केलं आहे. मालिकेत सीन करताना त्यांनी मला आधी सगळं काही सांगितलं होतं. पण निवेदिता ताई समोर होत्या. पण तो सीन अप्रतिम झाला,” असं मेघा यांनी सांगितलं.
मेघा घाडगेने मराठी मनोरंजनसृष्टीत विविध भूमिका साकारल्या आहेत. ‘पछाडलेला’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेचीही विशेष चर्चा झाली होती. अभिनयासोबतच नृत्य आणि इतर कलाक्षेत्रातील कामासाठीही त्या ओळखल्या जातात. अशोक सराफ यांच्यासोबतच्या या आठवणीमुळे तिच्या मुलाखतीतील हा किस्सा सध्या चर्चेत आला आहे.