
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Devghar On Rent Movie: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यात आता ‘देवघर ऑन रेंट’ या बहुचर्चित चित्रपटाची भर पडली आहे. अध्यात्म, रहस्य, थरार आणि अॅक्शन यांचा संगम असलेल्या या चित्रपटाची कथा एका रहस्यमय देवघराभोवती घडणाऱ्या घटनांवर आधारित आहे. पोलिसांचा पाठलाग, गुन्हेगारी आणि सूडाची कहाणी चित्रपटातून उलगडणार आहे.
नुकतंच या चित्रपटातील ‘अगं आई गं…’ हे धमाकेदार गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, रिलीज झाल्यापासून अल्पावधीतच या गाण्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील या गाण्यात आपल्या खास अंदाजात थिरकताना दिसत आहे.
‘अगं आई गं…’ हे अस्सल मराठमोळा ठेका आणि आधुनिक संगीताचा सुंदर मेळ साधणारं नृत्यगीत आहे. गौतमी पाटीलने आपल्या ठसकेबाज अदा, मनमोहक हावभाव आणि लयबद्ध ठेक्यांनी गाण्याची रंगत वाढवली आहे.
गौतमीसोबत असलेल्या सहकलाकारांची धमाल आणि उत्साहाने भरलेलं रंगीबेरंगी वातावरण यामुळे हे गाणं लक्षवेधी ठरत आहे. लेखक-गीतकार संजय नवगिरे यांनी गाण्याचे बोल लिहिले असून, संगीतकार कबीर शाक्य यांनी त्याला संगीत दिलं आहे. पार्श्वगायिका मुग्धा कऱ्हाडे यांनी आपल्या दमदार आवाजात हे गाणं गायलं आहे.
२५ सप्टेंबरला चित्रपट होणार प्रदर्शित
‘देवघर ऑन रेंट’ हा चित्रपट २५ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्रासह बेळगाव, हैदराबाद, इंदोर आणि बडोदा येथे प्रदर्शित होणार आहे.
आनंदी पिक्चर्स अमरावती प्रस्तुत आणि राधाकृष्ण प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाची निर्मिती सचिन रोडे पाटील आणि पूनम चौधरी पाटील यांनी केली आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन स्वरूप सावंत यांनी केलं आहे. चित्रपटाची संकल्पना पूनम चौधरी पाटील यांची असून कथा, पटकथा आणि संवादलेखन संजय नवगिरे यांनी केलं आहे.
‘केजीएफ’ फेम गरुडा रामही महत्त्वाच्या भूमिकेत
‘देवघर ऑन रेंट’मध्ये निखिल चव्हाण, अंकित मोहन, भाऊ कदम, शशांक शेंडे, अश्विनी चवरे, वैभव चव्हाण, सुरेश विश्वकर्मा, अनिल नगरकर आणि सिद्धेश्वर झाडबुके यांच्या भूमिका आहेत.
याशिवाय ‘केजीएफ’ फेम गरुडा राम आणि श्रवण राघवेंद्र हे दाक्षिणात्य कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यामुळे चित्रपटाच्या स्टारकास्टबाबतही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
चित्रपटातील गाण्यांना संगीतकार एस. सागर आणि कबीर शाक्य यांनी संगीत दिलं आहे. गाण्यांची कोरिओग्राफी किशोर दळवी यांनी केली आहे. चैतन्य साळुंके यांनी सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी सांभाळली असून रोहित नागभीडे यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे.
चित्रपटातील अॅक्शन सीक्वेन्सची जबाबदारी राकेश पाटील आणि कार्तिक डंगरी यांनी घेतली आहे. कला दिग्दर्शन दिलीप कंधारे, वेशभूषा अपेक्षा गांधी सोनी आणि रंगभूषा सुजीत सुरवसे यांनी केली आहे.
चित्रपटाचे कार्यकारी निर्माते अनुनेहा घोडके असून निर्मिती व्यवस्थापक म्हणून यश सणस यांनी काम पाहिलं आहे. अक्षय लोणदे यांनी सिंक साऊंड, शर्मा यांच्या टीमने प्रकाशयोजना आणि विजय म्हस्के यांनी प्रॉडक्शन हेड म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
आता रहस्य, थरार, अॅक्शन आणि मराठमोळ्या संगीताचा अनुभव देणारा ‘देवघर ऑन रेंट’ प्रेक्षकांना किती भावतो, हे २५ सप्टेंबरला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.