
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Hruta Durgule: अभिनेत्री हृता दुर्गुळे सध्या तिच्या ‘आली मोठी शहाणी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकत्याच लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत तिने सोशल मीडियावरील ट्रोलिंगवर स्पष्टपणे भाष्य केलं. लग्न, वजन वाढणं आणि भविष्यातील मातृत्व यावरून होणाऱ्या टीकेबाबत हृता दुर्गुळेने आपलं मत मांडलं आहे.
सोशल मीडियावर ट्रोलिंगचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक कलाकारांना याचा सामना करावा लागतो. हृता दुर्गुळेने सांगितलं की, सुरुवातीच्या काळात ट्रोलिंगचा तिला खूप त्रास व्हायचा. मात्र, आता सोशल मीडियावर कोण काय बोलतंय याकडे ती फारसं लक्ष देत नाही. ती सोशल मीडियावर फार सक्रिय नसल्यामुळे ट्रोलिंगचा तिच्यावर पूर्वीसारखा परिणाम होत नाही.
याबाबत बोलताना हृता म्हणाली, “मी कालच म्हटलं की ट्रोलिंग खूप बोअर आहे. मला असं वाटतं की तुम्ही कुठेही बसून कमेंट करता आणि खूप वाईट बोलता. माणूस म्हणून आपण काय करू शकतो, तर एकमेकांशी चांगलं वागू शकतो. महिलांवर टीका करणं हे तर खूपच वाईट आहे.”
हृता दुर्गुळेने आपल्या प्रवासाबद्दलही भाष्य केलं. टेलिव्हिजनवरील प्रवासातच तिचा मुलगी ते बाई असा टप्पा पार पडला. या काळात वजन वाढणं हा देखील आयुष्याचा एक सामान्य भाग असल्याचं तिने सांगितलं. मात्र, वजन वाढल्यानंतर तिलाही सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
“मी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा मी १७ वर्षांची होते आणि आता मी त्याच्या दुप्पट वयाची आहे. मुलगी ते बाई हा प्रवास टेलिव्हिजनवरच झाला आहे. आयुष्यात मध्ये एक काळ असा असतो की तुमचं वजन वाढतं. जेव्हा माझं वजन वाढलं तेव्हा मलाही खूप ट्रोल करण्यात आलं. पण सुदैवाने माझ्या आजूबाजूची माणसं खूप चांगली आहेत,” असं हृता म्हणाली.
‘मीही गरोदर राहिल्यानंतर ट्रोल होईन’
भविष्यात आई झाल्यानंतरही सोशल मीडियावर आपल्याला ट्रोल केलं जाऊ शकतं, याची जाणीव हृताला आहे. बाळ झाल्यानंतर वजन वाढल्यास त्यावरूनही टीका होऊ शकते, असं तिने स्पष्टपणे सांगितलं.
“मीही गरोदर राहिल्यानंतर मलाही ट्रोल करण्यात येईल, माझ्यावरही बाळ झाल्यानंतर टीका होईलच. तुम्ही किती लोकांना थांबवणार?” असा सवाल हृताने केला.
हृता दुर्गुळेने अभिनेता प्रतीक शाहसोबत लग्न केलं. त्यावेळी अमराठी मुलाशी लग्न केल्यावरूनही तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं. याबाबत बोलताना ती म्हणाली, “लग्न लवकर केलं म्हणत ट्रोल केलं. त्यात शाह आडनावाच्या मुलाशी केलं त्यामुळे ट्रोल केलं. त्यामुळे आता यावर काय बोलणार.”
या सगळ्यावर आपण याआधीही प्रतिक्रिया दिली नव्हती आणि पुढेही देणार नसल्याचं हृता दुर्गुळेने स्पष्ट केलं. “मी यावर आधीही कधी प्रतिक्रिया दिली नाही, पुढेही देणार नाही,” असं तिने सांगितलं.