
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Manjar Marathi Movie: मराठी मनोरंजनसृष्टीत वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही चित्रपटांच्या कथा लक्ष वेधून घेतात, तर काहींची नावंही उत्सुकता निर्माण करतात. सध्या अशाच एका आगळ्यावेगळ्या नावामुळे चर्चेत आलेला चित्रपट म्हणजे ‘मांजर’. पोस्टरपासूनच या चित्रपटाच्या नावाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, त्याने उत्सुकता आणखी वाढवली आहे.
‘मांजर’च्या टीझरमध्ये चार मित्रांच्या आयुष्यात एका मागोमाग एक घडणाऱ्या भन्नाट घटनांमुळे अक्षरशः उलटापालट होताना पाहायला मिळते. एखादी गोष्ट सुरळीत करण्याचा प्रयत्न केला की परिस्थिती आणखी बिघडते आणि त्यातून नवा किस्सा तयार होतो. पात्रांची धावपळ, एकमेकांना सावरण्याच्या प्रयत्नात वाढत जाणारा गोंधळ आणि त्यातून निर्माण होणारा विनोद यामुळे हा चित्रपट एक धमाल फॅमिली एंटरटेनर असल्याची झलक टीझरमधून मिळते.
मात्र या सगळ्या गोंधळात ‘मांजर’ नेमकं कुठे आहे, हा प्रश्न अद्याप कायम आहे. चित्रपटाच्या नावामागचं रहस्य टीझरमध्येही उलगडण्यात आलेलं नाही.
‘मांजर’ ही केवळ तीन मित्रांची गोष्ट नसून त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या मजेशीर आणि गोंधळात टाकणाऱ्या घटनांची धमाल कॉमेडी असल्याचं टीझरमधून दिसतं. सिद्धार्थ मेनन, ओंकार भोजने, तेजस राऊत आणि भाग्यश्री लिमये यांच्या व्यक्तिरेखांभोवती या गंमतीजमतींचा केंद्रबिंदू फिरताना दिसतो.
या चौघांसोबत सयाजी शिंदे, अंशुमन विचारे, वैष्णवी आंधळे आणि अश्विनी काळसेकर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. प्रत्येक पात्र कथेत काही ना काही भर घालत असल्याने पुढच्या क्षणी काय घडणार, याचा अंदाज बांधणं कठीण असल्याची झलक टीझरमधून मिळते.
टीझरच्या शेवटी ऐकू येणारा एक संवाद या चित्रपटाच्या नावामागचं गूढ आणखी वाढवतो. ‘चित्रपटाचे नाव ‘मांजर’ जरी असलं ना, तरी तिच्याशी माझा काही संबंध…’ असा संवाद ऐकू येतो आणि त्यानंतर टीझर संपतो. विशेष म्हणजे, शेवटी मांजरीचा आवाजही ऐकू येतो.
त्यामुळे ‘मांजर’चा या सगळ्या गोंधळाशी नेमका काय संबंध आहे? की या नावामागे एखादा भन्नाट ट्विस्ट दडलेला आहे? याचा उलगडा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच होणार आहे.
दिग्दर्शक सुशील महादेव यांची खास प्रतिक्रिया
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक सुशील महादेव म्हणतात, “‘मांजर’ हा चित्रपट प्रेक्षकांना मनापासून हसवणारा आणि शेवटपर्यंत गुंतवून ठेवणारा चित्रपट आहे. पडद्यावर घडणाऱ्या गंमतीजंमतींचा आनंद घेताना प्रेक्षकांनी स्वतःलाही या प्रवासाचा एक भाग समजावं, हीच आमची इच्छा आहे. हा चित्रपट फॅमिली एंटरटेनर असल्याने प्रेक्षकांनी हा चित्रपट आपल्या कुटुंबासोबत पाहावा.”
१८ सप्टेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार ‘मांजर’
एचथ्रीओ मोशन पिक्चर्स आणि जस्ट राईट फिल्म्स प्रस्तुत ‘मांजर’ या चित्रपटाचं दिग्दर्शन सुशील महादेव यांनी केलं आहे. हर्ष, अविनाश शर्मा, हरि राजपूत, बंटी नागी आणि जसबीर नागी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. एए फिल्म्सकडून चित्रपटाचं वितरण करण्यात येणार आहे.
सिद्धार्थ मेनन, ओंकार भोजने, तेजस राऊत, भाग्यश्री लिमये, सयाजी शिंदे, अंशुमन विचारे, वैष्णवी आंधळे आणि अश्विनी काळसेकर अशी तगडी स्टारकास्ट असलेला ‘मांजर’ येत्या १८ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. आता या भन्नाट गोंधळामागे ‘मांजर’चं नेमकं रहस्य काय आहे, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.