
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Patri Sarkar 1942 : मराठी चित्रपटसृष्टीत लवकरच भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका धगधगत्या ऐतिहासिक पर्वाची गाथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. सातारा भूमीत ब्रिटिश सत्तेला आव्हान देणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारचा जाज्वल्य इतिहास ‘पत्री सरकार १९४२’ या आगामी मराठी चित्रपटातून उलगडणार आहे. या चित्रपटाचे अधिकृत पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले असून, हा चित्रपट २० नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सातारा जिल्ह्यातील प्रतिसरकारच्या चळवळीला विशेष महत्त्व आहे. ब्रिटिश राजवटीविरोधात भूमिगत राहून लढा देणाऱ्या क्रांतिकारकांचे धैर्य, त्याग आणि शौर्य यांचा इतिहास ‘पत्री सरकार १९४२’ या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरमधून स्वातंत्र्यपूर्व काळातील संघर्षाचे वातावरण आणि क्रांतिकारकांचा करारी बाणा पाहायला मिळतो. त्यामुळे या ऐतिहासिक चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘भागीरथी मोशन पिक्चर्स’ प्रस्तुत या चित्रपटातून स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाच्या अध्यायाला रुपेरी पडद्यावर स्थान मिळणार आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारच्या इतिहासाची ओळख नव्या पिढीला करून देण्याच्या दृष्टीनेही या चित्रपटाकडे लक्ष लागले आहे.
अंकित मोहन अतिथी भूमिकेत; उपेंद्र लिमये यांचे निवेदन
‘पत्री सरकार १९४२’ या चित्रपटाची निर्मिती विशाल गोविंदराव जाधव यांनी केली आहे. लेखन, गीत, संगीत आणि दिग्दर्शनाची जबाबदारी मनीष अनसुरकर यांनी सांभाळली आहे. चित्रपटात अनिल राबाडे, अनुराधा धामणे, सिद्धार्थ बदी, शुभम गवई, रश्मी साळवी आणि तृप्ती शेडगे हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
याशिवाय लोकप्रिय अभिनेता अंकित मोहन अतिथी भूमिकेत झळकणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते उपेंद्र लिमये यांच्या दमदार आवाजातील निवेदन हेही चित्रपटाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असणार आहे.
चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी संदीप वाटवे, परमहंस पाठक आणि सुमेध मराठे यांनी सांभाळली आहे. संकलन अनिल मोकल यांचे असून, पार्श्वसंगीत सौरभ लता शिवकुमार यांनी दिले आहे.
ऐतिहासिक संघर्ष, क्रांतिकारकांचे शौर्य आणि स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणादायी गाथा मोठ्या पडद्यावर अनुभवण्याची संधी ‘पत्री सरकार १९४२’मधून मिळणार आहे. चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर आता प्रेक्षकांचे लक्ष त्याच्या पुढील अपडेट्सकडे लागले आहे. ‘पत्री सरकार १९४२’ हा चित्रपट २० नोव्हेंबरला महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.