
Colors Marathi New Serial : प्रेमाची ओढ अन् देशसेवेचं स्वप्न! कलर्स मराठीवर येतेय नवी मालिका 'लागलिया ओढ जिवा'
Colors Marathi New Serial : प्रेमकथा अनेक पाहिल्या असतील, पण देशभक्तीची भावना आणि प्रेमाची हळुवार ओढ यांचा संगम असलेली एक नवी गोष्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलर्स मराठी वाहिनी ‘लागलिया ओढ जिवा’ ही नवी मालिका घेऊन येत आहे. साताऱ्याच्या रांगड्या मातीत फुलणारी ही प्रेमकहाणी प्रेक्षकांना नक्कीच भावणारी ठरेल, अशी झलक मालिकेच्या टीझरमधून पाहायला मिळत आहे.
कलर्स मराठीने नुकताच या मालिकेचा एआय आधारित टीझर प्रदर्शित केला आहे. या टीझरमध्ये साताऱ्याच्या मातीतील खास गोडवा, तेथील ग्रामीण वातावरण आणि एका तरुण जोडप्याची हळुवार फुलणारी प्रेमकहाणी पाहायला मिळते. मात्र, मालिकेतील मुख्य कलाकारांचे चेहरे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहेत. टीझरच्या शेवटी ही जोडी एनसीसी कॅडेट्सच्या गणवेशात दिसते. त्यामुळे मालिकेची कथा नेमकी काय असणार, याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
साताऱ्याच्या मातीत देशप्रेमाचं सपान पुरं व्हणार आन् प्रेम फुलणार! ❤️ 🇮🇳.
येतेय एक नवी ‘खट’ लवस्टोरी, जी नुसतं ‘याड’ नाय ‘ओढ’ बी लावणार 🥰. ‘लागलिया ओढ जीवा’, लवकरच कलर्स मराठीवर. #LagaliyaOdhJeeva #ComingSoon #NewShow #ColorsMarathi https://t.co/LDa75oMDUU — Colors Marathi (@ColorsMarathi) November 19, 2026
या मालिकेचं वैशिष्ट्य म्हणजे प्रेमकथेच्या केंद्रस्थानी असणारं देशसेवेचं स्वप्न. प्रेमात पडण्याआधी मातृभूमीसाठी काहीतरी करण्याची जिद्द बाळगणाऱ्या दोन तरुणांचा प्रवास या मालिकेतून उलगडणार आहे. ‘साताऱ्याची हवाच भारी, मातीत भिनलीया पिरतीची खुमारी… पण दोघांचं बी सपान एकच हुतं, आधी देशासाठी संग झटायचं अन मंग पिरमात रंगायचं!’ या संवादातून मालिकेची ग्रामीण ढंगातील भाषा आणि प्रेमकथेचा गाभा समोर येतो.
प्रेम, मैत्री, देशभक्ती आणि तरुणाईची स्वप्नं अशा भावनांची गुंफण या मालिकेत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ही केवळ प्रेमकहाणी न राहता देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देणारा प्रवासही ठरू शकतो.
या नव्या मालिकेतील मुख्य कलाकार कोण असणार, त्यांची जोडी कशी असेल आणि साताऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही प्रेमकहाणी कोणतं वळण घेणार, याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे. ‘लागलिया ओढ जिवा’ ही मालिका लवकरच कलर्स मराठीवर प्रसारित होणार आहे.
Ans: 'लागलिया ओढ जिवा' ही मालिका कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
Ans: ही मालिका साताऱ्याच्या पार्श्वभूमीवर फुलणाऱ्या प्रेमकथेवर आधारित आहे. यात देशसेवा आणि देशभक्तीला महत्त्व देण्यात आले आहे.
Ans: टीझरमध्ये साताऱ्याचं ग्रामीण वातावरण, तरुण जोडप्याची प्रेमकहाणी आणि एनसीसी कॅडेट्सच्या गणवेशातील जोडीची झलक पाहायला मिळते.