
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
झी मराठीवरील लोकप्रिय ‘कमळी’ मालिका सुरुवातीपासूनच आपल्या प्रेरणादायी कथानकामुळे प्रेक्षकांची मने जिंकत आहे. शिक्षण, आत्मविश्वास आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा संदेश देणारी ही मालिका अनेक तरुणींसाठी प्रेरणास्थान ठरली आहे.
सध्या मालिकेत कमळीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा दाखवला जात आहे. गाव सोडून उच्च शिक्षणासाठी शहरात आलेल्या कमळीने आपल्या मेहनतीच्या जोरावर पहिल्याच वर्षात 96% गुण मिळवत मोठं यश मिळवलं आहे. तिचा निकाल विशेष सोहळ्यात शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते जाहीर करण्यात आला, ज्यामुळे या क्षणाला अधिक महत्त्व प्राप्त झालं.कमळीच्या या यशामुळे मालिकेतील कथानकाला नवा उत्साह मिळाला असून प्रेक्षकांमध्येही आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
‘कमळी’ मालिकेतील सध्याच्या ट्रॅकविषयी बोलताना कमळीची भूमिका साकारणारी अभिनेत्री विजया बाबर भावुक झाल्याचे दिसून आले. या यशाच्या क्षणाबद्दल बोलताना त्यांनी कमळीच्या प्रवासाचे महत्त्व अधोरेखित केले.
ती म्हणाली, “कमळीसाठी हा खूप मोठा आणि भावनिक क्षण आहे. मालिकेच्या पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांनी तिचा संघर्ष पाहिला आहे. घर सोडून शिक्षणासाठी नवीन शहरात येणं, अनेक अडचणींवर मात करणं आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणं, हा तिचा प्रवास प्रेरणादायी आहे. त्यामुळे 96% गुण मिळवण्याचा हा क्षण फक्त कमळीचाच नाही, तर तिच्यासोबत हा प्रवास अनुभवणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाचाही आहे.”
ती पुढे म्हणाली, “कमळीच्या मोठ्या स्वप्नाची ही फक्त सुरुवात आहे. तिच्या कथेतून अनेक तरुण मुलींना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याची प्रेरणा मिळेल, अशी मला आशा आहे.”
या प्रसंगाच्या चित्रीकरणाने विजयालाही तिच्या कॉलेजच्या दिवसांची आठवण करून दिली. त्याबद्दल ती म्हणाली, “हा सीन करताना मला माझे कॉलेजचे दिवस आठवले. आमच्या वेळी टक्केवारीऐवजी सीजीपीए पद्धत होती. मी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) केले असून मला १० पैकी ८ -८.५ सीजीपीए मिळाले होते. तसेच दहावी आणि बारावीमध्येही मला ८० ते ८१ टक्के गुण मिळाले होते. त्यावेळी असे काही मोठ सेलिब्रेशन झाल नव्हत, पण माझ्या आयुष्यात काही चांगलं घडलं की मी सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायला जाते. त्यामुळे हा सीन करताना त्या सगळ्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.”
कमळीच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा टप्पा तिच्या पुढील प्रवासाची नवी सुरुवात ठरणार आहे. तिची जिद्द, मेहनत आणि शिक्षणावरील विश्वास प्रेक्षकांना पुढेही प्रेरणा देत राहणार आहे.