(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कंगना रणौतच्या ‘भारत भाग्य विधाता’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, अंगावर काटा आणणार हा ट्रेलर असून हा चित्रपट देशाच्या त्या नायकांना आदरांजली आहे, ज्यांना आपण नावाने नव्हे, तर त्यांच्या कार्यामुळे ओळखतो. २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान शौर्य दाखवून, स्वतःची पर्वा न करता इतरांच्या मदतीसाठी पुढे आलेल्या नर्सेस, वॉर्ड बॉय, सफाई कर्मचारी, लिफ्ट ऑपरेटर, सुरक्षा कर्मचारी आणि प्रशासकांना हा चित्रपट आदरांजली आहे.
सुमारे २ मिनिटे २४ सेकंदांचा ट्रेलर २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांनी सुरू होतो. चित्रपटाची कथा सत्य घटनांवरून प्रेरित असल्याचे म्हटले जाते. ही कथा कंगना रणौतने साकारलेल्या एका नर्सभोवती फिरते.
ट्रेलरमध्ये दिसते की, कंगना रुग्णालयातील प्रत्येक रुग्णाची खूप काळजी घेते आणि सर्वांना आनंदी ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करते, पण तिला तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मुंबईत दहशतवादी हल्ला झाल्यावर कथेला एक वेगळे वळण मिळते. एक नर्स स्वतःच्या आरामापेक्षा आपल्या रुग्णाच्या काळजीला कसे प्राधान्य देते, हे दाखवण्याचा या चित्रपटात प्रयत्न केला आहे.
या चित्रपटात गिरिजा ओक चीही एक दमदार भूमिका आहे. चित्रपटातील अनेक दृश्ये थक्क करणारी आहेत. दहशतवादी हल्ल्यांदरम्यान कामा हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी ४०० लोकांचे प्राण वाचवण्यासाठी कसा जीवापाड संघर्ष केला, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. ही कथा एका अशा हॉस्पिटलभोवती फिरते, जिथे भीती आणि गोंधळाचे वातावरण असूनही, तेथील कर्मचारी धैर्याने आणि हुशारीने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करतात. संकट कितीही मोठे असले तरी, माणुसकी हीच सर्वात मोठी शक्ती असू शकते, हा संदेश देण्याचा या चित्रपटाचा प्रयत्न आहे.
यापूर्वी, कंगनाने चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करत म्हटले होते, “या चित्रपटात चित्रित केलेली माणसे अशी आहेत, ज्यांचा गणवेश कधीही दुर्लक्षित होत नाही. रक्ताने माखलेले ॲप्रन घातलेले हॉस्पिटल कर्मचारी, साध्या कपड्यांमध्ये काम करणारे आणि रुग्णांची सेवा करणारे हेच खरे हिरो आहेत. खरे शौर्य पदक किंवा पुरस्काराची वाट पाहत नाही. ते तेव्हा प्रकट होते, जेव्हा एखादी व्यक्ती इतरांना वाचवण्यासाठी स्वतःला धोक्यात घालते.”
कंगना रणौत चित्रपटाबद्दल म्हणाली, “‘भारत भाग्य विधाता’ हा चित्रपट त्या अदृश्य व्यक्तींना समर्पित आहे, जे संकटाच्या काळात मानवतेसाठी ढाल बनून उभे राहतात. जेव्हा एखादा मोठा अपघात किंवा आपत्ती येते, तेव्हा लोक सर्वप्रथम आशेने पोलीस, सैन्य किंवा सरकारकडे पाहतात. पण हा चित्रपट अशा लोकांची कथा सांगतो, जे कोणत्याही मान्यतेची किंवा कौतुकाची अपेक्षा न करता इतरांसाठी उभे राहतात.”
ट्रेलर पाहिल्यानंतर, लोकांनी आधीच म्हणायला सुरुवात केली आहे की कथा दमदार आहे आणि प्रत्येक फ्रेम अप्रतिम आहे. कंगनाच्या एका चाहत्याने म्हटले, “फक्त कंगनासारखी अभिनेत्रीच असा विषय हाताळू शकते.” दुसऱ्याने म्हटले, “असे दिसते की कंगना आणखी एक राष्ट्रीय पुरस्कार जिंकणार आहे. काय जबरदस्त स्क्रीन प्रेझेन्स आहे! ही उत्कृष्ट कलाकृती पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही.”
सोशल मीडियाने बदललं आयुष्य! YouTube-insta मुळे प्रसिद्ध झालेले मराठी Content creators कोण?
“भारत भाग्य विधाता” कधी प्रदर्शित होत आहे?
“भारत भाग्य विधाता” डॉ. जयंतीलाल गडा यांच्या पेन स्टुडिओद्वारे सादर करण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती पेन स्टुडिओ, मणिकर्णिका फिल्म्स, परमहंस क्रिएशन्स, युनोइया फिल्म्स एलएलपी आणि फ्लोटिंग रॉक्स एंटरटेनमेंट प्रा. लि. यांनी केली आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन मनोज तापारिया यांनी केले आहे. हा चित्रपट १२ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. कंगना राणौत व्यतिरिक्त या चित्रपटात गिरीजा ओक, स्मिता तांबे, अमृता नामदेव, एशा डे, प्रिया बेर्डे, आशा शेलार, सुहिता थत्ते, रसिका आघासे, आदित्य मिश्रा आणि जाहिद खान यांच्याही भूमिका आहेत.






