
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Marathi Actress Payal Pandey: मराठी मालिकाविश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. छोट्या पडद्यावरील विविध मालिकांमधून अल्पावधीतच घराघरात पोहोचलेली अभिनेत्री पायल पांडे आई झाली आहे. काही दिवसांपूर्वीच पायलने एका गोंडस मुलाला जन्म दिला असून, आता तिने सोशल मीडियावर आपल्या लेकाची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
पायलच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. आई झाल्यानंतर अभिनेत्रीने मुलासोबतचा खास फोटो शेअर करत त्याचं नावही जाहीर केलं आहे. पायलच्या या पोस्टनंतर चाहत्यांसह मनोरंजनविश्वातील कलाकारांकडूनही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मुलाच्या जन्माची गोड बातमी शेअर करत पायलने एक भावुक पोस्ट लिहिली आहे. “हजारो स्वप्नं आणि न बोललेल्या प्रार्थनांच्या दरम्यान तू आमच्यापर्यंत पोहोचलास. आणि अचानक आयुष्य आमच्या कल्पनेपेक्षाही सुंदर झालं. एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली, एका नव्या लयीत आमची मनं रमली आणि दोनाचे तीन झालो,” अशा आशयाचं तिने म्हटलं आहे.
पुढे तिने आपल्या लेकाचं नावही जाहीर केलं. “हा मुलगा आहे. त्याचं नाव वीर आहे. आमचा छोटासा चमत्कार, आमचा सर्वात मोठा आशीर्वाद. या छोट्याशा जीवाने आमच्या जगाला आणखी मोठं आणि सुंदर केलं,” असं पायलने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
आपल्या नव्या आयुष्याबद्दल बोलताना पायलने पुढे लिहिलं की, आता त्यांच्या आयुष्यात झोप न येणाऱ्या रात्री, छोट्या छोट्या हास्याचे क्षण, भरपूर मिठ्या आणि या सुंदर नव्या जगाचा आयुष्यभर शोध घेण्याचा प्रवास सुरू झाला आहे. “आमचं तीन जणांचं कुटुंब, आमची नवी सुरुवात आणि कायमचं प्रेम,” अशा भावनिक शब्दांत तिने ही पोस्ट शेअर केली आहे.
पायल पांडेच्या या आनंदाच्या बातमीने तिचे चाहतेही सुखावले आहेत. अभिनेत्रीने आपल्या लेकाचं नाव ‘वीर’ ठेवल्याचं जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.