(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Mrunmayee Deshpande: मराठी मनोरंजनसृष्टीतील बहुआयामी आणि गुणी अभिनेत्री म्हणून मृण्मयी देशपांडेची ओळख आहे. अभिनयासोबतच नृत्य, लेखन, दिग्दर्शन आणि सूत्रसंचालन अशा विविध क्षेत्रांत त्यांनी आपली वेगळी छाप पाडली आहे. ‘कुंकू’, ‘एका पेक्षा एक’, ‘जोडीचा मामला’, ‘अप्सरा आली’ यांसारख्या मालिका आणि कार्यक्रमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या मृण्मयी सध्या ‘सा रे ग म प’च्या सुरेल मंचाचं सूत्रसंचालन करत आहेत.
संगीताची विशेष आवड असलेल्या मृण्मयींसाठी ‘सा रे ग म प’ हा केवळ एक रिअॅलिटी शो नसून, पुन्हा एकदा झी कुटुंबात परतल्यासारखा अनुभव आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जुन्या आठवणींनाही उजाळा मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं.
‘सा रे ग म प’च्या मंचावर सूत्रसंचालनाची पुन्हा संधी मिळाल्याबद्दल मृण्मयी देशपांडे यांनी आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “मला स्वतःला गाणी ऐकायला फार आवडतात. ‘सा रे ग म प’मध्ये सूत्रसंचालन करणं माझ्यासाठी झी कुटुंबात घरी परत आल्यासारखं आहे. झी मराठीवर मी अनेक मालिका आणि कार्यक्रम केले आहेत.”
‘कुंकू’ मालिकेनंतर ‘एका पेक्षा एक’, ‘जोडीचा मामला’, ‘अप्सरा आली’ आणि अनेक रिअॅलिटी शोचा प्रवास त्यांनी केला. त्यामुळे ‘सा रे ग म प’शी जोडले जाणं हा त्यांच्यासाठी अविस्मरणीय आणि सुरेल प्रवास असल्याचं मृण्मयींनी सांगितलं.
‘सा रे ग म प’मधील स्पर्धकांच्या प्रवासाबद्दल बोलताना मृण्मयी म्हणाल्या की, प्रत्येक स्पर्धकाचं एक वेगळं स्वप्न आणि संघर्ष असतो. स्पर्धेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांच्या आवाजात होणारा बदल, वाढलेला आत्मविश्वास आणि स्टेजवर परफॉर्म करण्याची कला पाहणं खूप महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं.
त्यांच्या मते, आजच्या काळात केवळ चांगलं गाणं पुरेसं नसून व्यक्तिमत्त्व विकासही तितकाच महत्त्वाचा आहे. स्पर्धकांमध्ये हा बदल पहिल्या दिवसापासून फिनालेपर्यंत हळूहळू विकसित होताना दिसतो आणि हा संपूर्ण प्रवास अतिशय मजेशीर असतो.
‘गुरुजींसोबतचा तो क्षण अविस्मरणीय’
‘सा रे ग म प’मधील अविस्मरणीय क्षण सांगताना मृण्मयींनी गुरुजी म्हणजेच सुरेशजींसोबतचा अनुभव शेअर केला. त्या म्हणाल्या की, गुरुजी गात असताना सेटवरील सगळेजण त्यांच्या सोबत नाचत होते. प्रत्यक्ष त्यांच्या आवाजात गाणी ऐकण्याची संधी मिळणं हा ‘सा रे ग म प’मधील त्यांच्या आयुष्यातील खास क्षण असल्याचं त्यांनी सांगितलं.
मृण्मयींच्या मते, संगीत हा असा धागा आहे जो सगळ्यांना एकत्र बांधून ठेवतो. नव्या पर्वातून मराठी संगीतापासून दुरावलेले प्रेक्षक पुन्हा संगीताशी जोडले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जुन्या गाण्यांचं नव्या पद्धतीने सादरीकरण आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठीही हे पर्व खास असणार आहे. जुन्या गाण्यांचा पुनःप्रत्ययाचा आनंद देतानाच नव्या पिढीच्या आवाजाला व्यासपीठ मिळणार आहे.
सूत्रसंचालक म्हणून स्पर्धकांना आत्मविश्वास देण्याची आपली भूमिका महत्त्वाची असल्याचंही मृण्मयींनी सांगितलं.
त्या म्हणाल्या, “स्पर्धक स्टेजवर येताना नेहमीच थोडे तणावात असतात. मी बराच वेळ स्पर्धकांसोबत असते, आम्ही गप्पा मारतो. कधी कधी गात असताना एखाद्या स्पर्धकाची नजर आपल्यावर पडते आणि आपण त्यांचं गाणं एन्जॉय करतोय, त्यांच्या गाण्याला मनापासून दाद देतोय, ही गोष्ट त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी खूप महत्त्वाची असते.”
स्पर्धकांना सतत आनंदी आणि आत्मविश्वासपूर्ण वाटत राहावं, ही आपली जबाबदारी असल्याचं मृण्मयींनी सांगितलं.
‘सा रे ग म प’ने अनेक उत्तम गायकांना व्यासपीठ दिलं आहे. रिअॅलिटी शोच्या महत्त्वाबद्दल बोलताना मृण्मयी म्हणाल्या की, तळागाळात अनेक कला दडलेल्या असतात. टेलिव्हिजनच्या माध्यमातून या कलाकारांना मोठ्या प्रेक्षकवर्गासमोर आपली कला सादर करण्याची संधी मिळते.
“मी स्वतः याचं मोठं उदाहरण आहे. ‘कुंकू’ मालिकेनंतर माझं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने बदललं,” असंही त्यांनी सांगितलं.
मोठ्या स्पर्धकांचे सूर बऱ्याच काळापासून ‘सा रे ग म प’मधून ऐकायला मिळालेले नाहीत. त्यामुळे दर्जेदार गाणी त्यांच्या मूळ स्वरूपात ऐकण्याचा आणि संपूर्ण सेट सुरांनी भरून जाण्याचा आनंद आपण घेत असल्याचं मृण्मयींनी सांगितलं.
‘सा रे ग म प’चं हे नवं पर्व नव्या पिढीचा आवाज, त्यांची विचार करण्याची पद्धत आणि संगीताकडे पाहण्याची बदललेली दृष्टी प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहे.
Drishyam 3: अजय देवगणने घेतलं तब्बल येवढं कोटी मानधन? ‘दृश्यम ३’मधील कलाकारांची फी ऐकून बसेल धक्का!






