(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी वेबविश्वात सस्पेन्स-थ्रिलरच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ‘पौर्णिमेचा फेरा’ ही लोकप्रिय वेब सिरीज आता नव्या वळणावर पोहोचली आहे. पहिल्या दोन सीझनना मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर आणि प्रेक्षकांच्या जोरदार मागणीनंतर ‘पौर्णिमेचा फेरा सीझन ३’ अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
शुभम प्रोडक्शन फिल्म्स निर्मित या वेबसिरीजचा तिसरा भाग त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. सस्पेन्स, रहस्य आणि थराराने भरलेला हा नवा सीझन प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवणारा ठरत आहे.दरम्यान, सोशल मीडियावरही ‘पौर्णिमेचा फेरा 3’ची जोरदार चर्चा रंगली असून प्रेक्षकांकडून या वेबसिरीजला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कथानकातील नवे ट्विस्ट आणि थरारक सादरीकरणामुळे ही सिरीज पुन्हा एकदा प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.
थरार, उत्कंठा, शोध या नजरबंदीच्या खेळातून अनुत्तरीत प्रश्नांचा शोध घेणारी ‘पौर्णिमेचा फेरा’ ही मराठी वेब सिरीजचा तिसरा भाग ‘शुभम प्रोडक्शन फिल्म्स’ या चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आला आहे. हास्यजत्रा कार्यक्रमातले विनोदवीर निखील बने आणि मंदार मांडवकर आपल्याला या वेब सिरीजमध्ये वेगळ्याच भूमिकेत पहायला मिळतात. त्यांना सिद्धेश नागवेकर या नव्या दमाच्या कलाकारासोबत, संदीप रेडकर, दीपा माळकर, प्राची केळुस्कर, निकिता बंदावणे, चंदन जमदाडे, संजय वैद्य, स्नेहल आयरे या सगळ्यांची साथ लाभली आहे. सगळ्या कलाकारांनी त्यांच्या भूमिका चांगल्या केल्या आहेत. ही वेब सिरीज बघताना प्रत्येकजण त्या त्या भूमिकेत चपखल बसलेला असल्याचं जाणवतं.
‘तारक मेहता का…’ फेम Disha Vakani वर कोसळला दुःखाचा डोंगर; वडिलांच्या निधनाने भावुक झाली अभिनेत्री
या वेब सिरीजची निर्मिती पायल गणेश कदम यांनी केली असून, दिग्दर्शनाची धुरा सचिन गोताड यांनी सांभाळली आहे. कथेचे संवाद आणि पटकथा संदेश लोकेगावकर यांची असून, छायाचित्रण कुणाल महादेव परडकर यांनी केले आहे. कार्यकारी निर्माता म्हणून हेमंत दिनकर पांचाळ लाभले आहेत. या सीरीजचे संकलन शिलंत कदम यांनी केले आहे. अनिरुद्ध निमकर याने संगीत दिले आहे.
रहस्याचा नवा प्रवास
‘पौर्णिमेचा फेरा’ या वेब सिरीजची मांडणी इतर कथांपेक्षा वेगळी असल्यानेच ती अल्पावधीत लोकप्रिय झाली. पहिल्या सीझनमध्ये तीन मित्रांच्या गावी जाण्यापासून सुरू झालेला हा प्रवास एका खोल रहस्यात जाऊन अडकला. एका मित्राला वाचवण्याच्या प्रयत्नात सुरू झालेला हा खेळ दुसऱ्या सीझनमध्ये अधिक गडद आणि थरारक झाला. आता, जिथे दुसरा सीझन संपला, तिथूनच एका मोठ्या रहस्याचा उलगडा करण्यासाठी सीझन ३ सज्ज झाला आहे.






