(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Tharala Tar Mag Serial: ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता प्रतीक सुरेश लवकरच खऱ्या आयुष्यात बाबा होणार आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. त्यामुळे प्रतीकवर सध्या चाहत्यांसह मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
प्रतीक सुरेशने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिलं आहे, “आमच्या आयुष्यातील बेस्ट भूमिकांमध्ये (आई-बाबा) आम्ही लवकरच एन्ट्री घेतोय. आमच्या चिमुकल्याचं आगमन नोव्हेंबर 2026 मध्ये होणार आहे.”
या पोस्टमधून प्रतीकने त्याच्या आयुष्यातील या खास क्षणाची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली. नोव्हेंबर 2026 मध्ये त्यांच्या चिमुकल्या बाळाचं आगमन होणार आहे.
प्रतीकने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर “लवकरच एक खास गोष्ट मी तुम्हा सर्वांना सांगणार आहे”, अशी पोस्ट शेअर करत चाहत्यांना एक हिंट दिली होती. त्यामुळे प्रतीक नेमकी कोणती गुडन्यूज देणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागली होती. अखेर त्याने बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी शेअर करत ही उत्सुकता संपवली.
View this post on Instagram
प्रतीकने शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक मराठी कलाकारांनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. जुई गडकरी, केतकी पालव, ऋतुजा बागवे यांच्यासह अनेक कलाकारांनी प्रतीकला त्याच्या आयुष्यातील या नव्या प्रवासासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
विशेष म्हणजे, ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सध्याच्या ट्रॅकशी प्रतीकच्या खऱ्या आयुष्यातील ही बातमी काहीशी जुळताना दिसत आहे. मालिकेत प्रतीक अश्विन सुभेदार ही भूमिका साकारत आहे. मालिकेच्या कथानकानुसार अश्विनची पत्नी प्रियासुद्धा गरोदर आहे.
त्यामुळे प्रतीक ऑनस्क्रीनही बाबा होण्याच्या भूमिकेत आहे आणि आता ऑफस्क्रीनही त्याच्या आयुष्यात बाबा होण्याचा नवा प्रवास सुरू होणार आहे. मालिकेतील त्याची भूमिका आणि खऱ्या आयुष्यातील ही आनंदाची बातमी यामुळे चाहत्यांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे.
नोव्हेंबर 2026 मध्ये प्रतीकच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार असून, या नव्या प्रवासासाठी चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत.






