(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Veen Doghantali Hi Tutena : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. मालिकेत आतापर्यंत अनेक ट्विस्ट आणि चढ-उतार पाहायला मिळाले. समर आणि स्वानंदीच्या नात्यात आलेल्या अडचणींमुळे त्यांचं नातं अधिकच घट्ट झालं आहे. आता या दोघांच्या आयुष्यात आणखी एक मोठा आणि महत्त्वाचा टप्पा येणार आहे.
झी मराठीने सोशल मीडियावर मालिकेचा नवा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमधून समर आणि स्वानंदीने आई-बाबा होण्याचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या संसारात एका नव्या पर्वाची सुरुवात होण्याची शक्यता आहे.
प्रोमोमध्ये समर स्वानंदीसाठी चाफ्याचं फूल घेऊन येतो. फूल पाहून स्वानंदी त्याचा सुगंध घेत म्हणते, “या फुलाचा सुगंध घेतला की कसं प्रसन्न वाटतं. तसं गणू आजूबाजूला असताना मन प्रसन्न होऊन जायचं.”
यानंतर समर स्वानंदीला जवळ घेत आपल्या मनातील भावना व्यक्त करतो. तो म्हणतो, “नंतर आपण दोघेच असू, त्याचा अर्थ आता कळतोय. आपण दोघेच असण्यापेक्षा आपल्या दोघांचं काहीतरी असावं असं मला वाटतं. आपलं बाळ असावं वाटतं.” समरच्या या बोलण्यावरून दोघांनी आपल्या कुटुंबात एका नव्या सदस्याच्या आगमनाचा विचार केल्याचं स्पष्ट होत आहे.
प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव
समर-स्वानंदीच्या या निर्णयाचा प्रोमो समोर येताच मालिकेच्या चाहत्यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. दोघांनी आई-बाबा होण्याचा विचार केल्याने त्यांच्या संसारात नवा बहर येणार असल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. कमेंट्समधून चाहत्यांनी या निर्णयाचं कौतुक करत दोघांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
दरम्यान, अष्टविनायक यात्रेवरून परतल्यानंतर समर आणि स्वानंदीसमोर नवं संकट उभं राहिलं आहे. मल्लिका काकूंनी स्वानंदीची आई मंदाकिनी हिने समरच्या क्रेडिट कार्डवरून तब्बल १० लाख रुपयांची खरेदी केल्याचं सर्वांना सांगितलं. ही गोष्ट समोर येताच कुटुंबाला मोठा धक्का बसला.
या प्रकरणावरून स्वानंदीने आपल्या आईला जाब विचारला. त्यामुळे स्वानंदी आणि मंदाकिनी यांच्यात वादाची ठिणगी पडली. त्यात मल्लिका काकूंनी आणखी भर घातल्याने हे प्रकरण चांगलंच तापलं.
प्रदीप रावांसमोर मोठं आव्हान
स्वानंदीचे वडील प्रदीप राव यांनी मल्लिका काकूंना १० लाख रुपये फेडण्याचा शब्द दिला आहे. आता प्रदीप राव हा शब्द कसा पूर्ण करणार? तसेच समर-स्वानंदीच्या आयुष्यात येणाऱ्या या नव्या पर्वासोबत आणखी कोणती आव्हानं उभी राहणार? हे आगामी भागांमध्ये पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.






