
marathi drama
एकांकिका निवडण्यापासूनच विद्यार्थ्यांची खरी परीक्षा
प्रयोग सादर करण्यासाठी करावे लागते प्रचंड मेहनत
अभ्यास आणि नाटकाचा सराव यांचा समतोल साधणे ही कसरत
पुणे/Entertainment रंगमंचावर पडदा उघडतो आणि अवघ्या ३० ते ४० मिनिटांत एखादी कथा प्रेक्षकांसमोर उभी राहते. टाळ्यांचा कडकडाट होतो, कलाकारांचे कौतुक होते; मात्र या काही मिनिटांच्या प्रयोगामागे असते ती अनेक महिन्यांची धावपळ, मेहनत आणि स्वप्नांची गोष्ट. सध्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करणाऱ्या पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने ही पडद्यामागची दुनिया पुन्हा चर्चेत आली आहे.
एकांकिका निवडण्यापासूनच विद्यार्थ्यांची खरी परीक्षा सुरू होते. संहिता वाचन, दिग्दर्शकाची संकल्पना, पात्रांची निवड, अभिनयाची तयारी आणि संवादफेकीचा सराव यासाठी अनेक आठवडे खर्ची पडतात. त्यानंतर रंगमंचाचा आराखडा, नेपथ्य, प्रकाशयोजना, ध्वनी, संगीत आणि वेशभूषा यांची जुळवाजुळव सुरू होते. कमी खर्चात, उपलब्ध साधनांचा कल्पक वापर करून प्रभावी दृश्य उभे करण्याचे आव्हान विद्यार्थ्यांसमोर असते.
महाविद्यालयीन अभ्यास आणि नाटकाचा सराव यांचा समतोल साधणे हीदेखील मोठी कसरत असते. दिवसभर महाविद्यालयातील तास, असाइनमेंट आणि परीक्षा यांची तयारी करून संध्याकाळी तालमीसाठी जमावे लागते. अनेकदा रात्री उशिरापर्यंत संवाद, प्रवेश, हालचाली आणि प्रकाशयोजनेचे प्रयोग सुरू असतात. एखादा संवाद अपेक्षित परिणाम देत नसेल, एखादी रंगमंचावरील हालचाल चुकत असेल किंवा नेपथ्यात बदल आवश्यक वाटत असेल, तर पुन्हा पुन्हा सराव केला जातो.
या प्रक्रियेत केवळ कलाकारच नव्हे, तर पडद्यामागील प्रत्येक विद्यार्थी महत्त्वाची भूमिका बजावतो. कोणी सेट तयार करते, कोणी रंगकाम करते, कोणी संगीत आणि ध्वनीची जबाबदारी सांभाळते, तर कोणी प्रकाशयोजनेवर लक्ष देते. काही विद्यार्थी प्रसंगी कलाकार, तंत्रज्ञ आणि व्यवस्थापक अशा अनेक भूमिका एकाच वेळी निभावतात.
स्पर्धेच्या दिवशी मात्र या सर्व मेहनतीचा कस लागतो. रंगमंचावर काही मिनिटांत सादर होणाऱ्या एकांकिकेत विद्यार्थ्यांचे अनेक महिन्यांचे श्रम, मैत्री, मतभेद, जागरणे, अपयश आणि पुन्हा उभे राहण्याची जिद्द सामावलेली असते. त्यामुळे पुरुषोत्तम करंडकातील प्रत्येक एकांकिका ही केवळ अभिनयाची स्पर्धा नसून, तरुणाईच्या सर्जनशीलतेची, संघभावनेची आणि मेहनतीची रंगमंचावर उमटलेली कहाणी असते.
Bhau Kadam: भाऊ कदम पुन्हा रंगभूमीवर! ‘पहिली लग्नाची.. दुसरी प्रेमाची’चा पुण्यात रंगणार पहिला प्रयोग
रंगमंचावर आमचा प्रयोग ३०-४० मिनिटांचा असतो; पण त्यामागे अनेक महिन्यांचा सराव असतो. अभ्यास, परीक्षा आणि तालमी यांचा समतोल साधताना अनेकदा रात्री उशिरापर्यंत मेहनत करावी लागते. मात्र प्रयोगाच्या दिवशी पडदा उघडल्यानंतर सगळा थकवा विसरून जातो.”
— सुजल बर्गे, महाविद्यालयीन विद्यार्थी, एकांकिका स्पर्धक.
एकांकिका ही केवळ कलाकारांची मेहनत नसते. नेपथ्य, प्रकाश, ध्वनी, संगीत, वेशभूषा यापासून ते रंगमंचावरील प्रत्येक हालचालीपर्यंत संपूर्ण टीम काम करत असते. एखाद्या छोट्याशा प्रयोगाला प्रभावी बनवण्यासाठी पडद्यामागे मोठी टीम अनेक दिवस झटत असते.
—वृषाली, एकांकिका स्पर्धक, ललित कला मंदिर.