
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Rahul Gandhi: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत इंदौरमध्ये झालेल्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमातील एक सादरीकरण सध्या चर्चेत आहे. स्टँड-अप कॉमेडियन पुलकित मणी यांनी या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलण्याच्या शैलीची आणि काही सार्वजनिक प्रसंगांची नक्कल केली. राहुल गांधी या सादरीकरणावेळी मंचावर उपस्थित होते आणि हसताना दिसले. या व्हिडीओनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
१९ सप्टेंबर रोजी इंदूरमध्ये ‘छात्रों की गूंज’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली. त्याच कार्यक्रमात कॉमेडियन पुलकित मणीने मोदींच्या बोलण्याच्या शैलीची मिमिक्री केली.
या सादरीकरणात मोदींच्या इंग्रजी बोलण्याच्या शैलीचा तसेच परदेशी नेत्यांशी संवाद साधताना त्यांच्या ‘हग डिप्लोमसी’ म्हणून चर्चेत आलेल्या शैलीचा संदर्भ देण्यात आला. एका जुन्या प्रसंगात पंतप्रधानांनी एका वृद्ध महिलेला खुर्ची देण्याची ऑफर केल्याच्या घटनेवरही विनोद करण्यात आल्याचं वृत्त आहे.
या मिमिक्रीच्या वेळी राहुल गांधी मंचावर उपस्थित होते. व्हिडीओमध्ये ते या सादरीकरणाला हसून प्रतिसाद देताना दिसतात. त्यानंतर या कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर झाले आणि भाजप नेत्यांकडून राहुल गांधी तसेच काँग्रेसवर टीका करण्यात आली.
दरम्यान, काँग्रेसकडून या सादरीकरणाचा बचाव करण्यात आला असून, हा विनोद आणि मिमिक्रीचा भाग असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या कार्यक्रमातील सादरीकरणावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे.
आगे कभी भी देश की बागडोर ऐसे नेता को देना उचित होगा जो देश की संस्कृति मातृभाषा गले मिलने के प्रथा का मजाक उड़ाएं
In future, will it b appropriate 2 hand over the responsibility of the country to a leader who makes fun of the country’s culture,mother tongue the gesture of hugging https://t.co/1Wx01csK1c — Sunil lahri (@LahriSunil) September 21, 2026
‘रामायण’ मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लाहरी यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी व्हिडीओ शेअर करत राहुल गांधींच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदींची मिमिक्री केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
सुनील लाहरी यांनी पंतप्रधानांनी मातृभाषेत भाषण करण्यावरून केली जाणारी टीका, भारतीय संस्कृती आणि परंपरांबाबत करण्यात आलेल्या विनोदांवर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या मते, कोणत्याही नेत्याच्या पदाचा आणि देशाच्या सांस्कृतिक मूल्यांचा मान राखला पाहिजे.
सुनील लाहरी यांनी आपल्या प्रतिक्रियेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातृभाषेत भाषण करण्याच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. इंग्रजी ही केवळ एक भाषा असून, अनेक देशांचे नेते आपल्या मातृभाषेतच भाषण करतात, असं त्यांनी म्हटलं.
तसंच एखाद्या वृद्ध महिलेला खुर्ची देण्यासारख्या प्रसंगाची खिल्ली उडवण्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. या संपूर्ण घटनेकडे गांभीर्याने पाहण्याचं आवाहन त्यांनी केलं.
या प्रकरणावरून सध्या राजकीय नेते, कलाकार आणि सोशल मीडिया युजर्स यांच्यात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. राजकीय व्यंग आणि सार्वजनिक पदावरील व्यक्तींचा सन्मान याबाबतचा हा वाद सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.