
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Raksha Bandhan 2026: रक्षाबंधन हा केवळ राखी बांधण्याचा सण नसून भावंडांमधील प्रेम, आपुलकी आणि आयुष्यभराच्या सोबतीचा उत्सव आहे. बालपणी रक्षाबंधन म्हटलं की घरातील गडबड, भावंडांची मस्ती, भेटवस्तू, मिठाई आणि दिवसभराची धमाल डोळ्यांसमोर येते. काळ पुढे सरकतो आणि प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात व्यस्त होतो. मात्र, रक्षाबंधनाच्या निमित्ताने बालपणीच्या त्या गोड आठवणी पुन्हा मनात ताज्या होतात.
भावंडांसोबत केलेली मस्ती, छोटी-मोठी भांडणं आणि एकत्र साजरे केलेले सण मोठं झाल्यावर आणखी खास वाटतात. याच रक्षाबंधनाच्या निमित्ताने झी मराठीच्या कलाकारांनी आपल्या बालपणीच्या आठवणी आणि भावंडांसोबतच्या नात्याबद्दलच्या खास भावना व्यक्त केल्या आहेत.
‘सारेगमप’ची सूत्रसंचालिका मृण्मयी देशपांडे यांनी रक्षाबंधनाच्या आठवणी सांगताना त्यांच्या मोठ्या कुटुंबातील धमाल आठवली. त्या म्हणाल्या की, त्यांच्या घरी सख्या दोन बहिणी आहेत; मात्र सख्खा भाऊ नसला तरी चुलत भावंडांची मोठी फौज आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशी भावंडांची एक रांग आणि ओवाळणी करणाऱ्या बहिणींची दुसरी रांग असायची. भेटवस्तू, मिठाई आणि भरपूर धमाल असा माहोल असायचा. त्यांच्या घरी रक्षाबंधनासाठी जवळपास ५०-६० जण एकत्र यायचे. दिवसभराच्या गोंधळानंतर सगळी भावंडं एका खोलीत जाऊन दोन-तीन तास झोपायची. त्या अवस्थेतील मजेशीर फोटो आजही पाहिल्यावर हसू येत असल्याचं मृण्मयी यांनी सांगितलं.
मोठं झाल्यानंतर मात्र या नात्याला वेगळा आयाम मिळाला आहे. आज एकमेकांना न सांगताही अनेक गोष्टी समजतात, गरज पडल्यास आधार दिला जातो आणि भावना सहज ओळखल्या जातात. त्यामुळे भावंडांचं नातं आणखी घट्ट झाल्याचा आनंद मृण्मयी यांनी व्यक्त केला.
‘तुला जपणार आहे’ मालिकेतील नर्मदा रामपुरे अर्थात अभिनेत्री पौर्णिमा तळवलकर यांच्याही रक्षाबंधनाच्या अनेक गोड आठवणी आहेत. बालपणी रक्षाबंधनाच्या दिवशी त्या सर्व चुलत भावंडांसोबत एकत्र यायच्या.
पौर्णिमा कथ्थक शिकत होत्या, तर त्यांची बहीण पल्लवी वैद्य हिलाही नृत्याची आवड होती. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी एखाद्या गाण्यावर नृत्य बसवून ते घरच्यांसमोर सादर करायचे. त्यांच्या वडिलांचा प्रिंटिंग प्रेस असल्यामुळे तिथेही भावंडांची धमाल रंगायची. कटिंग पेपरमध्ये खेळणे, नाचणे आणि लपाछपी खेळण्यात सुट्टीचा दिवस कधी संपायचा हे कळायचंच नाही.
काही चुलत भाऊ तळेगावला राहत असल्याने त्यांना रक्षाबंधनाच्या वेळी पोस्टाने राखी पाठवली जायची. त्यांच्याकडून येणाऱ्या पत्राचीही वेगळीच मजा होती. आज तंत्रज्ञानामुळे संवाद सहज शक्य असला तरी त्या पत्रांच्या आठवणी अजूनही मनात ताज्या असल्याचं पौर्णिमा यांनी सांगितलं.
लहानपणी मस्ती, भांडणं आणि मारामारी करणारी भावंडं मोठी झाल्यावर एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होतात. आज तिघेही एकमेकांशी प्रत्येक गोष्ट शेअर करतात आणि अडचणीच्या वेळी एकमेकांना मदतीचा हात देतात. ‘आपली हक्काची दोन माणसं आहेत’, ही भावना खूप समाधान देणारी असल्याचं पौर्णिमा यांनी सांगितलं.
‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत शारदाची भूमिका साकारणारी एकता लब्दे या आपल्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहेत. त्यामुळे त्या आपल्या चुलत भावंडांसोबत रक्षाबंधन साजरं करतात. मात्र शूटिंगमुळे प्रत्येक वेळी भावंडांना भेटणं शक्य होत नाही.
रक्षाबंधनाच्या दिवशी एकता सर्वप्रथम देवाला राखी बांधतात आणि त्यानंतर त्यांची आई त्यांना राखी बांधते. आईने बांधलेली ही राखी त्यांच्यासाठी एका सुंदर विचाराचं प्रतीक आहे.
एकता यांच्या मते, रक्षण करणं ही केवळ पुरुषांची किंवा भावाची जबाबदारी नाही. मुलगीही कुटुंबाची ढाल, आधार आणि गरजेच्या वेळी कवच बनू शकते. आईने बांधलेल्या या राखीतून त्यांना समानता, आत्मविश्वास आणि जबाबदारीची जाणीव मिळते. भविष्यात आई-वडिलांचा खंबीर आधार बनण्याची भावना या राखीमुळे अधिक दृढ होत असल्याचं त्यांनी सांगितलं.
अशा प्रकारे कलाकारांच्या रक्षाबंधनाच्या आठवणींमधून बालपणीची धमाल, भावंडांमधील निखळ प्रेम आणि काळानुसार अधिक घट्ट होत जाणाऱ्या नात्याची सुंदर झलक पाहायला मिळते.