(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Shakeel Noorani Arrest: चित्रपटसृष्टीत कास्टिंग काउच आणि लैंगिक छळाच्या घटनांबाबत अनेक अभिनेत्री यापूर्वी बोलल्या आहेत. आता मनोरंजन विश्वातून आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. ‘जोरू का गुलाम’ आणि ‘बडे दिलवाला’ यांसारख्या हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक शकील नूरानी यांना मुंबई पोलिसांनी लैंगिक छळाच्या प्रकरणात अटक केली आहे.
७३ वर्षीय शकील नूरानी यांच्याविरोधात एका ३३ वर्षीय अभिनेत्रीने मालवणी पोलिसांकडे बलात्कार आणि लैंगिक छळाची तक्रार दाखल केल्याची माहिती आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी नूरानी यांना अटक केली. अटकेनंतर त्यांना बोरिवली हॉलिडे कोर्टात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्यांना १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी चित्रपटाच्या प्रोजेक्टवर चर्चा करण्याच्या बहाण्याने शकील नूरानी यांनी ३३ वर्षीय अभिनेत्रीला मालवणी येथील त्यांच्या घरी बोलावल्याचा आरोप आहे. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
याशिवाय, अभिनेत्रीला कथितरित्या अमली पदार्थ देण्यात आल्याचा आणि त्यानंतर एका व्हिडिओच्या माध्यमातून तिला धमकावून दबाव आणल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मालवणी पोलिसांकडून सुरू आहे.
मालवणी पोलिसांनी शकील नूरानी यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ६४(२)(एम), १२३, ३५१(२) आणि ८८ अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं, त्यानंतर न्यायालयाने १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
शकील नूरानी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून ओळखले जातात. त्यांनी १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘विष्णू देवा’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं.
Mrunal Thakur : मृणाल ठाकूर १० वर्षांनी लहान क्रिकेटरला डेट करतेय? अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर
१९९९ मध्ये आलेल्या ‘बडे दिलवाला’ या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती त्यांनी केली होती. यानंतर गोविंदा आणि ट्विंकल खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘जोरू का गुलाम’ या चित्रपटाचंही त्यांनी दिग्दर्शन केलं. २००० मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्यावेळी चर्चेत आला होता.याशिवाय त्यांनी २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेजाब: द ॲसिड ऑफ लव्ह’ या चित्रपटाचंही दिग्दर्शन केलं होतं. दरम्यान, अभिनेत्रीने केलेल्या आरोपांप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे आता लक्ष लागलं आहे.






