फोटो सौजन्य - Social Media
एखादा व्यवसाय सुरु करण्यापूर्वी शांती आणि भरभराटीसाठी पूजा करणे हा अनेक भारतीयांचा विश्वास आहे. हाच विश्वास मनात कायम ठेवून Soundous Moufakir ने तिच्या नव्या व्यवसायाची सुरुवात केली. आयोजित केलेल्या या पूजेची पोस्ट पाहता तिच्या काही चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. तर अनेकांनी तिला ट्रॉलही केले आहे. पण तिने या ट्रॉलर्सला सडेतोड उत्तर देत कमेंट केली आहे की, “मला माझ्या मुस्लिम धर्माचा अभिमान आहे आणि माझा धर्म नेहमीच माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग राहील. पण माझ्यासोबत काम करणारे हिंदू सहकारीही माझ्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत. हा नवा प्रवास सुरू करण्यापूर्वी त्यांनाही त्यांच्या श्रद्धेनुसार समाधान मिळावे, अशी माझी इच्छा होती. जसं त्यांनी माझ्या नमाज आणि प्रार्थनेच्या वेळी माझी साथ दिली, तसंच मीही त्यांच्या श्रद्धेचा आदर केला. खरी टीम म्हणजे एकमेकांच्या श्रद्धेचा सन्मान करत कायम एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं.”
सुंदुसने शेअर केलेल्या या पोस्टखाली सुंदर असे कॅप्शन देत तिच्या नव्या व्यवसायाविषयी माहिती दिली आहे. तिने नमूद केले आहे की, “आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आणि अविस्मरणीय ठरला. आज @moromaaofficial च्या नव्या प्रवासाची सुरुवात आम्ही पहिल्या पूजेने केली. कोणत्याही यशापूर्वी देवाचे आशीर्वाद घेणं, कृतज्ञता व्यक्त करणं आणि हा प्रवास योग्य दिशेने व्हावा, हीच आमची भावना होती. आमच्या कामाला यश मिळावं, संपूर्ण टीमवर देवाची कृपा राहावी आणि प्रत्येक पाऊल सकारात्मकतेने पुढे पडावं, अशी मनापासून प्रार्थना केली. आज टीमसोबत उभं असताना पुन्हा एकदा जाणवलं की, कोणताही ब्रँड एका व्यक्तीच्या बळावर उभा राहत नाही. तो विश्वास, मेहनत, समर्पण आणि एकत्र काम करणाऱ्या माणसांमुळे घडतो. अशा टीमसोबत हा प्रवास सुरू करण्याची संधी मिळणं, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. मोरोमावर पहिल्या दिवसापासून प्रेम, विश्वास आणि पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार. तुमच्या विश्वासामुळेच हा प्रवास अधिक अर्थपूर्ण झाला आहे. देवाने आपल्या सर्वांवर सदैव कृपा ठेवावी, प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो. हा प्रवास आता फक्त सुरू झाला आहे… पुढचा प्रवास आणखी सुंदर असेल.”






