
मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, 'जेजे'मध्ये रोबोने केली पहिली शस्त्रक्रिया
नीता परब, मुंबई : सर जे.जे. रुग्णालयाने आणखी एक मोलाची कामगिरी केली आहे. ज्यामुळे जे जे रुग्णालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. रुग्णालयाच्या न्यूरोसर्जरी आणि ऑर्थोपेडिक्स विभागातील डॉक्टरांनी महाराष्ट्रातील पहिली रोबोटिक स्पायनल डिफॉर्मिटी करेक्शन शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे धुळे येथील २४ वर्षीय मुलगी जन्मजात स्पायनल डिफॉर्मिटी (शरीर झुकणे) आणि तेलंगाणा येथील किशोरवयीन मुलगा पाच वर्षापासून पाठीला असलेल्या व्यंगाची समस्या कायमची दूर झाली असून हे दोन्ही रुग्ण व्यवस्थित उभे राहून चालू फिरू शकत आहेत.
धुळे येथील २४ वर्षीय दिव्या सूर्यवंशी आणि तेलंगणातील निजामाबाद येथील १५ वर्षीय रसूल शेख यांना गंभीर किफोस्कोलियोसिस विकृतीचा त्रास होता. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी काही दिवसांपूर्वी जेजे रुग्णालयात दाखल केले. विविध चाचण्या झाल्यानंतर अत्याधुनिक रोबोटिक तंत्रांच्या मदतीने डॉक्टरांनी अत्यंत अचूकतेने स्पायनल डिफॉर्मिटी काढून टाकली.
ही शस्त्रक्रिया न्यूरोसर्जरी विभागाचे प्रमुख डॉ.व्हर्नन वेल्हो, ऑर्थोपेडिक्स विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ कुशाल गोहिल, न्यूरोसर्जरी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ मजहर खान यांनी केली. या सर्जरीसाठी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ अजय भंडारवार, ऑर्थोपेडीक विभागाचे वरिष्ठ डॉ संगीत गव्हाळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय सुरासे, ऑर्थोपेडीक विभागाचे प्रमुख डॉ. नादिर शाह यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. दरम्यान या गुंतागुंतीच्या सर्जरीमध्ये भूल विभागाच्या प्रमुख डॉ. उषा बदले आणि डॉ. कुंदन गोसावी यांच्या नेतृत्वाखाली भूल पथकाने ही सर्जरी यशस्वी केली.
ऑर्थोपेडीक विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. कुशाल गोहिल म्हणाले की, रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबईत पहिल्यांदाच स्कोलियोसिस शस्त्रक्रिया करण्यात आली. ते म्हणाले की, “रोबोटिक्सने करण्यात आलेल्या या सर्जरीत अचूकता व जोखीम कमी झाली. तसेच पाठीचे व्यंग नाहीसे होवून रुग्ण लवकरात लवकर बरा होत आहे व तो व्यवस्थित चालू फिरू शकतो.