केरळमध्ये विद्यापीठात मोठी दुर्घटना, म्युझिक कॉन्सर्ट सुरू असताना चेंगराचेंगरी, ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू!

कॉन्सर्ट रंगात असताना अचानक पाऊस सुरू झाला. त्यामुळे बाहेर थांबलेल्या लोकांनी आश्रय घेण्यासाठी ऑडिटोरियममध्ये धाव घेतली, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची गर्दी झाली.

    कोची : केरळमधून मोठी बातमी समोर येत आहे. केरळच्या कोची ( Kerala University) येथील विद्यापीठात एका म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान चेंगराचेंगरी (tampede During Concert) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, किमान ६४ जण जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांपैकी चार विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले.

    नेमकं काय घडलं

    कोचीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठात शनिवारी ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. विद्यापीठात एक टेक फेस्ट आयोजित केला जात होता आणि यावेळी गायिका निखिता गांधी कॅम्पसमधील ओपन-एअर ऑडिटोरियममध्ये परफॉर्म करत होती. कॉन्सर्ट रंगात असताना अचानक पाऊस सुरू झाला. त्यामुळे बाहेर थांबलेल्या लोकांनी आश्रय घेण्यासाठी ऑडिटोरियममध्ये धाव घेतली, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची गर्दी झाली. जाण्यायेण्यास जागा अपुरी पडल्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि बरेच  विद्यार्थी खाली पडले. यावेळी चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, किमान ६४ जण जखमी झाले.

    मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांची तातडीची बैठक शनिवारी रात्री 8:30 वाजता कोझिकोड येथील सरकारी अतिथीगृहात झाली. मंत्र्यांनी शोक व्यक्त केला आणि या शोकांतिकेच्या पार्श्वभूमीवर सीपीएमच्या नवा केरळ सदस या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून रविवारी नियोजित सर्व उत्सव आणि कलात्मक कार्यक्रम रद्द केले जातील, असं सांगण्यात आलं आहे.