(Photo - Social Media)
नीता परब, मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून आणि त्यानंतर आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी परीक्षार्थींनी निर्धारित परीक्षा वेळेच्या किमान ३० मिनिटे अगोदर परीक्षा कक्षात उपस्थित राहणे (Mumbai University Exam Rules 2026-27) अनिवार्य करण्यात आले आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळ, व्यवस्थापन परिषद तसेच विद्वत परिषदेच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार हा नियम लागू करण्यात आला आहे.
परीक्षा कक्षात प्रवेश करण्यापूर्वी परीक्षार्थींची ओळखपत्र तपासणी, आसनव्यवस्था, आवश्यक पडताळणी आणि इतर परीक्षा प्रक्रियांसाठी वेळ आवश्यक असतो. त्यामुळे परीक्षा सुरू होण्याच्या अगदी शेवटच्या क्षणी परीक्षा कक्षात येणाऱ्या परीक्षार्थींना होणारी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
Navi Mumbai News : डिजिटल जन्मदाखल्यांना दिरंगाई; विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा खोळंबा
परीक्षेची निर्धारित वेळ सकाळी १०.३० वाजता असल्यास, परीक्षार्थींनी सकाळी १०.०० वाजेपर्यंत परीक्षा कक्षात उपस्थित राहणे आवश्यक आहे. परीक्षार्थींनी शेवटच्या क्षणी परीक्षा केंद्रावर किंवा परीक्षा कक्षात न येता आवश्यक ती पूर्वतयारी करून वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.
विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागांचे संचालक व प्रमुख, संलग्न, संचलित व स्वायत्त महाविद्यालयांचे प्राचार्य, मान्यताप्राप्त संस्थांचे संचालक तसेच विद्यापीठाच्या विविध उपपरिसरांचे समन्वयक व संचालक यांनी ही सूचना सर्व परीक्षार्थी, शिक्षक आणि परीक्षा कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊन तिची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. पूजा रौंदळे यांनी केले आहे. तसेच परीक्षार्थींनी विद्यापीठाच्या परीक्षा नियमांचे व सूचनांचे पालन करून परीक्षा सुरळीत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी परीक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक ते सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.




