(Photo - Social Media)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी मिळणार आणि त्यानंतर ते दिल्लीत जाणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. या चर्चांवर स्वतः फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर आता त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही भूमिका मांडली आहे.
नागपूर येथे आयोजित ‘मंथन फॉर यूथ हॅकथॉन’ कार्यक्रमात अमृता फडणवीस सहभागी झाल्या होत्या. यावेळी माध्यमांनी त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीवारीबाबत प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी फडणवीसांनी महाराष्ट्रातच राहून काम करावे, अशी स्पष्ट इच्छा व्यक्त केली.
“महाराष्ट्र हे देशातील एक महत्त्वाचे राज्य आहे. फडणवीसांना इथे सेवा करू द्या. त्यांना दिल्लीत का पाठवताय? देवेंद्र फडणवीस जबाबदार व्यक्ती आहेत. त्यांनी महाराष्ट्रातच राहिले पाहिजे,” अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून फडणवीस केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. दिल्ली दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्याने या चर्चांना आणखी हवा मिळाली. मात्र, फडणवीस यांनी आपण महाराष्ट्रातच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
‘मंथन फॉर यूथ’ कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी तरुणांच्या क्षमतेवर भर दिला. तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, उत्पादन क्षेत्र आणि शिक्षण यांसारख्या क्षेत्रांमध्ये तरुणांच्या कल्पनांना मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना फुटीप्रकरणी उद्या पुन्हा होणार सुनावणी; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादाने शिंदे गटात खळबळ
विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तरुणांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्या म्हणाल्या. “तुमच्या आयडिया बाहेर येऊ द्या, बदल घडवा आणि ग्लोबल व्हा,” असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, फडणवीसांच्या दिल्लीवारीवरून विरोधकांकडून सातत्याने राजकीय दावे केले जात आहेत. मात्र फडणवीस आणि आता अमृता फडणवीस यांच्या वक्तव्यांमुळे ते महाराष्ट्रातच राहणार असल्याचा संदेश पुन्हा अधोरेखित झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील संभाव्य जबाबदारीच्या चर्चांना सध्या तरी फडणवीसांनी स्वतःच पूर्णविराम दिल्याचे चित्र आहे.




