गोरखपूर : एका तरूणीने आपल्याच मैत्रिणीला 63 हजार रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात उघडकीस आला. तरुणीसोबत कारमधून जात असताना लोकांनी तिला अडवले. यानंतर चौकशी केल्यावर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. याप्रकरणी दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, एक मुलगी तिची आई आणि लहान बहिणीसोबत भाड्याच्या खोलीत राहत होती. मंगळवारी संध्याकाळी काही तरुणांनी त्यांचे घर गाठले आणि तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवून बरेलीला नेण्यास सुरुवात केली. यावेळी काही लोकांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतलं. यानंतर दोन तरुणांसह चौघांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
पीडित मुलीने सांगितले की, काही वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचा तिच्या आईसोबत वाद झाला होता. यामुळे ती तिची आई आणि लहान बहिणीसोबत वेगळ्या घरात राहत होती. यादरम्यान ती नोकरीच्या शोधात होती. यावेळी तिची भेट प्रियांकाशी झाली. तिने नोकरी देण्याचे आश्वासन दिले. पीडितेला मंगळवारी प्रियंकानं फोन करत ‘भेटायला ये, नोकरी मिळेल’, असे सांगितले. यानंतर संध्याकाळी परतत असताना प्रियांकाने एका गाडीकडे बोट दाखवून पीडितेला त्यात बसण्यास सांगितले.






