लखनऊ : उत्तर प्रदेशच्या कौशांबी जिल्ह्यात (Kaushambi District) मोठी घटना घडली. 21 वर्षीय मुलीला तिच्या जन्मदात्या आई-वडिलांनी संपवल्याचा प्रकार घडला. या मुलीचे प्रेमसंबंध (Love Affairs) असल्याचा संशय तिच्या आई-वडिलांना होता. मुलीची हत्या (Murder of Daughter) करताना तिच्या दोन नातेवाईकांनी साथ दिल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
उत्तर प्रदेशातील तेन शाह आलमबाद गावात वास्तव्यास असलेल्या नरेश यांनी त्यांची मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार 3 फेब्रुवारीला पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असता त्यांना संबंधित मुलीचा मृतदेह गावाबाहेरच्या कालव्यात सापडला. नरेश आणि त्याची पत्नी शोभादेवी यांनी 3 फेब्रुवारी त्यांच्या राहत्या घरात मुलीची गळा दाबून हत्या केल्याचं पोलिस तपासात उघड झालं.
शरीरावर ओतलं ऍसिड
मुलीच्या मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी तिच्या आई-वडिलांनी बॅटरीमधील ऍसिड तिच्या शरीरावर ओतलं. तिचा मृतदेह लपवण्यासाठी नरेशचा भाऊ गुलाब आणि रमेश यांनी मदत केली, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. मुलीचा मृतदेह लपवण्यात नरेशच्या भावांनी त्याला मदत केली. त्या दोघांनादेखील या प्रकरणात अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुलगी बोलायची अनेक मुलांशी
संबंधित तरूणी अनेक मुलांशी बोलायची. यावरून तिचे एखाद्या मुलासोबत प्रेमसंबंध असावेत, असा संशय त्यांना आला होता. त्यानुसार, त्यांनी तिच्याशी विचारपूस देखील केल्याचे सांगितले जात आहे.
बॅगमध्ये सापडले प्रेग्नन्सी टेस्ट किट
मुलीच्या बॅगमध्ये आम्हाला काही प्रेग्नन्सी टेस्ट किट्सदेखील सापडल्या. मुलीचे एखाद्या मुलाशी प्रेमसंबंध असावेत असा संशय आम्हाला आला. यामुळे आम्ही फार संतापलो होतो. त्याच रागाच्या भरात मुलीला संपवल्याची कबुली नरेश याने पोलिसांकडे दिली.