दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या अडचणीत वाढ (File Photo)
दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर आपचं राजकीय भविष्य धोक्यात असल्याचं सांगितलं जात असतानाच आपच्या पंजाब सरकारबद्दल वेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. काही दिवसांवर विधानसभेचे अधिवेशन आलेले असताना काँग्रेसचे नेते प्रताप सिंग बाजवा यांनी मोठा दावा केला आहे. आम आदमी पक्षाचे ३० ते ३५ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आम आदमी पक्षात नैराश्य पसरलं आहे. आपची आता एकाच राज्यात सत्ता राहिली आहे. नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल यांचाही पराभव झाला होता. त्यामुळे अरविंद केजरीवाल आता पंजाबमध्ये मुख्यमंत्री होतील, या चर्चेंने जोर धरला होता. त्यानंतर आता नवा दावा करण्यात आला आहे.
प्रताप सिंग बाजवा म्हणाले की, ” आम आदमी पक्षाचे ३० ते ३५ आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. पंजबाचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासोबत काम करताना आमदारांना अडचणी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे पूर्वीच्या तुलनेत कमी आमदारांचा पाठिंबा आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
Atishi Marlena : आपने आतिशींवर सोपवली मोठी जबाबदारी; विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत निर्णय
” कोट्यवधी रुपये अनधिकृत मार्गाने ऑस्ट्रेलिया आणि इतर दुसऱ्या देशांमध्ये पाठवण्यात आले आहेत. यात सीएलयू आणि मद्य विक्रीतून आलेला पैसा जास्त आहे. दिल्ली मॉडेल लुटीचं होतं. त्यात त्यांचं प्राविण्य आहे”, अशी बोचरी टीका बाजवा यांनी आप सरकारवर केली आहे. नुकताच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा मोठा पराभव झाला. त्यामुळे आता आपच्या पंजाबमधील सरकारचं काय होणार? याबद्दलही चर्चा सुरू आहेत. पंजाबमध्ये भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली सध्या सरकार आहे. 117 सदस्य असलेल्या पंजाब विधानसभेत आम आदमी पक्षाचे ९३ आमदार आहेत. तर कॉंग्रेसचे १६ आमदार आहेत.
दिल्लीतील पराभवानंतर पंजाब सरकारमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान भाजपमध्ये प्रवेश करणार असून लवकरच आपचं पंजाबमधील सरकार कोसळेल, असा दावा कॉंग्रेसच्या नेत्याने केला होता. त्यानंतर अरविंद केजरीवाल अलर्ट झाले होते. भगवंत मान, सरकारी मंत्री आणि आमदारांची राजधानी दिल्लीत तातडीची बैठक देखील बोलावण्यात आली होती.